लेथ मशीन कामात गैरव्यवहार ; दीपनगरातील दोन अधिकार्‍यांचे निलंबन

0

भुसावळ- दीपनगरातील तत्कालीन उपमुख्य अभियंता नितीन गगे व एनपीडी विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन रडे यांना महानिर्मितीच्या मुख्यालयाने निलंबीत केल्याने स्थानिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. दीपनगरातील 1992 मधील जुन्या लेथ मशिनच्या मेंटनन्ससाठी तब्बल एक कोटी रुपयांचे टेंडर काढून गैरव्यवहार केल्याचा ठपका उभयंतांवर ठेवण्यात आला आहे. दीपनगर औष्णिक केंद्राने 1992 मध्ये खरेदी केलेल्या लेथ मशिनच्या सर्व्हिसींगसाठी दीपनगर केंद्राने 50 लाखांची निविदा काढली होती. दोनवेळा हे सर्व्हिसींग झाल्याने तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च झाला. या प्रकरणी एका राजकिय पदाधिकार्‍याने महानिर्मितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची मुख्यालयातून चौकशी झाली. नवीन अत्याधुनिक पध्दतीची लेथ मशीन 15 ते 16 लाख रुपयांमध्ये मिळते मात्र स्थानिक अधिकार्‍यांनी नवीन मशिन खरेदी न करता जुने तंत्रज्ञान असलेल्या 1992 मधील मशीनवर मोठ्या प्रमाणात खर्च कसा केला? आदी मुद्दे समोर आल्याने या प्रकरणात गैरव्यवहार व निधीचा चुराडा झाल्याची बाब समोर आली.

तीन अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार?
जुन्या तंत्रज्ञानातील मशीनवर झालेला मोठ्या प्रमाणावरील खर्च तसेच या संदर्भात प्राप्त तक्रारीची महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे यांनी गांभीर्याने दखल घेतली. तत्कालीन उपमुख्य अभियंता तथा सध्या परळी औष्णिक केंद्रातील उपमुख्य अभियंता नितीन गगे व दीपनगरातील एनपीडी विभागातील कार्यकारी अभियंता नितीन रडे या दोघांचे निलंबन करण्याचे आदेश काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोन ते तीन अधिकारी निलंबित होणार असल्याची दाट शक्यता आहे.