ज्यांना व्लादिमीर लेनिन यांचे विचार, कार्य आणि जगाला असलेली त्यांच्या विचारांची गरज माहीत नाही, अशा झुंडांनी त्रिपुरातील विजयानंतर त्यांच्या पुतळ्यावर बुलडोझर फिरवला. पुतळे उखडले म्हणजे त्या महापुरुषांचे कार्य आणि विचार नेस्तनाबूत होतात, असे मानणार्या अल्पमतीच्या या झुंडांचा हा उपद्व्याप देश कदापिही सहन करणार नाही. मुळात एखाद्या महात्म्याला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला म्हणून गोळ्या घालणे सोपे असते. परंतु, काळ लोटतो तसा तो विचार अन् महात्माही जगाला गरजेचा वाटू लागतो. गोळ्या घालणारे कालही खलनायकच ठरतात, आजही ते खलनायकच असतात आणि भविष्यातही ते खलनायक म्हणूनच ओळखले जातात. श्रमिकांच्या हितासाठी त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान कोसळणार नाही, की गोरगरिबांच्या भाकरीची त्यांनी व्यक्त केलेली चिंताही मिटणार नाही. ज्या झुंडांनी उन्मादातून हे कृत्य केले, त्या झुंडांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. लेनिन तुम्ही या झुंडांना माफ करावे!
लेनिन माहीत नाही, असे जगात क्वचित कुणी असेल. ज्या झुंडांनी त्यांचा त्रिपुरातील बेलोनिया शहरातील पुतळा जेसीबीने उखडला आणि त्यांचे शीर वेगळे करून त्याचा फुटबॉल खेळला ते झुंड कोणत्याही राजकीय पक्षाचे असले, तरी त्यांच्या या कृत्याने लेनिन यांच्याबद्दलचा आदर आणि विश्वास तिळमात्रही कमी होणार नाही. उलट लेनिन जास्तीत जास्त देशवासीयांसमोर पोहोचतील आणि त्यांच्या साम्यवादी विचारांचा प्रसार-प्रचारच होईल. लेनिन यांच्या लालक्रांतीची माहिती सर्वांनाच आहे. आम्ही त्यांच्या कार्याकडे थोडे वेगळ्या नजरेतून पाहत आहोत. 1891 हे साल जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावे लागेल. लालक्रांतीचे जनक लेनिन याचवर्षी वकील झाले अन् इकडे भारतातही महात्मा गांधी लंडनमध्ये बॅरिस्टर झाले. म्हणजेच, लेनिन अन् गांधी यांनी एकाचवर्षी कायद्याची पदवी घेतली होती. पुढे या दोन महापुरुषांनी आपापले राष्ट्र घडवले, एकाने त्याच्या राष्ट्राची झारशाही, भांडवलदारांच्या पिळवणुकीतून सुटका केली तर दुसर्याने विदेशी सत्ता उलथावून लावली. फरक फक्त एवढाच होता की, एकाने हाती बंदूक घेतली, तर दुसर्याने शस्त्र हाती न घेता क्रांती घडवली. एकाने क्रांतीसाठी रक्ताची होळी खेळली तर दुसरा सत्याग्रहाच्या शस्त्राने रक्तविहीन क्रांती कशी घडवावी हे जगाला शिकवून गेला. आजही लेनिन अन् गांधी यांना संपूर्ण जग आपला नेता मानते. मार्ग वेगळे असले तरी त्यांनी शोषित अन् वंचितांना न्याय दिला, जगात समतेचे राज्य निर्माण करण्यासाठी आहुती दिली. या दोन घटनांपलीकडे आणखी एक महत्त्वाची नोंद येथे आवर्जुन घ्यावी वाटते. याच वर्षात म्हणजे, 14 एप्रिल 1891 मध्ये अशा एका महापुरुषाचा जन्म झाला ज्याने हजारो वर्षांपासून जातीयउतरंडीत खितपत पडलेल्या, दारिद्य्राने शोषित झालेल्या भारतीय दलितांचा उद्धार केला. ते म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. जेव्हा लेनिन, गांधी हे कायद्याचे शिक्षण घेऊन क्रांतीच्या वाटेवर निघाले होते, तेव्हा डॉ. आंबेडकर यांचा महूगावी जन्म झाला होता. पुढे डॉ. आंबेडकरांनी जी क्रांती केली ती साम्यवादाच्या वैचारिक मिश्रणाचीच फलश्रुती होती. त्यांनी साम्यवाद स्वीकारला नसला, तरी समतेचा विचार दिला. त्यांच्या विचार अन् कार्यावर त्याचा प्रभाव होताच. 1848 मध्ये कम्युनिस्टांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला अन् इकडे भारतात महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारे बहुजनांसाठी खुले केली. कार्ल मार्क्स जेव्हा मजूरवर्गाने हाती शस्त्रे घेऊन हुजूरवर्गाचे मुडदे पाडले पाहिजेत, असे सांगत होता. तेव्हा फुले समाजाला सुशिक्षित करून वैचारिक लढ्यास सज्ज करत होते. सांगायचे तात्पर्य काय, तर लेनिन असो, गांधी असो, की आंबेडकर असो या महामानवांनी आर्थिक समता आणून सामाजिक समतोल आणण्याचा प्रयत्न केला. भेद आणि जातीयता उद्ध्वस्त केली.
क्रांतीचे मार्ग वेगवेगळे असले, तरी समाजाप्रति असलेली त्यांची तळमळ अधोरेखित होते आणि महत्त्वाचे म्हणजे, वर्षातच पीक हवे असेल तर बी पेरा, पंधरा वर्षांचे नियोजन असेल तर झाडे लावा आणि शंभर वर्षांचे नियोजन असेल, तर समाजाला सुशिक्षित करा, त्यांच्यात क्रांतीची बीजे पेरा हा विचार या महापुरुषांनी समाजाला दिला. मार्क्सने मालकांना कापून तत्काळ सत्ता हस्तगत करण्याचा विचार मांडला, त्यात लेनिन यांनी सुधारणा करून रशियाची सत्ता हस्तगत केली. त्यांची विदेशनीती इतकी प्रभावी होती, त्यामुळे रशिया महासत्ता झाला. रशियन क्रांतीचा भारतावर दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतानेही साम्यवाद स्वीकारावा असा प्रवाह निर्माण झाला होता. परंतु, भारताची पायाभूत रचना पाहता, पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या द्रष्ट्या नेतृत्वाने साम्यवादी-लोकशाही हा मध्यममार्ग स्वीकारला. आज हाच मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार करत आहे. त्यांना नेहरूंचा विटाळ होतो, आता लेनिनचे पुतळे पाडण्याचे उद्योग सुरू आहेत. परंतु, पुतळे पाडून किंवा कुणाची विटंबना करून त्यांचे विचार मरत नसतात. उलट ते अधिक प्रभावशाली होऊन उसळून बाहेर येतात, हे या सत्ताधार्यांना कुणी तरी सांगायची गरज आहे. आर्थिक असमतोल दूर करण्याचा मार्ग दाखवणार्या लेनिन यांच्या विचारांना येथील झुंडशाही कदापिही नष्ट करू शकणार नाही. ज्यांना वैचारिक विरोधकांची खुलेआम कत्तल करण्याचा वारसा आहे, अशा झुंडांनी पुतळे उखडले म्हणजे ते विचार संपतील, असे समजण्याचा मूर्खपणा करण्याच्या भानगडीत पडू नये. आज तुम्ही लेनिनचे पुतळे पाडले, उद्या ते गांधी, आंबेडकर, नेहरू यांचेही पुतळे पाडण्यास पुढे येतील. अशा प्रकारची झुंडशाही लोकशाहीला मारक आहे, म्हणून राष्ट्राने त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ लोकशाहीमार्गाने निषेध नोंदवलाच पाहिजेत.
लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीतील जय-पराजय हा होतच असतो. म्हणून सत्तेवर आले म्हणजे विरोधी विचारांच्या महापुरुषांचे पुतळे पाडायचे असतात काय? नोटाबंदीमुळे सव्वा टक्क्यांनी जीडीपी घसरला म्हणजे, देशाचे जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातील कामगार, श्रमिकवर्ग यांच्यासह शेतकर्यांना बसला. त्यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाटा हा 45 टक्के इतका सर्वात मोठा आहे. देशाच्या 93 टक्केरोजगाराला तुम्ही उद्ध्वस्त करून बसला आहात. लेनिन यांचा पुतळा नष्ट करून तुम्ही या वर्गाला लेनिनच्या विचारांची आठवण करून देत आहात. कारण, आजच्या त्यांच्या परिस्थितीत ते विचारच त्यांना जवळचे वाटू शकतात. देशातील शांतता टिकवणे हे मोदी सरकारचे कर्तव्य आहे, पुतळे पाडून देश अशांत करण्याचे पाप झुंडशाहीला करू देऊ नका, असा सल्ला आम्ही आवर्जून मोदी सरकारला देत आहोत. ज्या झुडांनी पुतळा पाडला, त्या मूर्खांना लेनिन यांनी क्षमा करावी!