पिंपरी : काही दिवसांपुर्वी घेतलेला लेनोव्हो मोबाईल बंद पडल्यामुळे कंपनीने ग्राहकास बदलून देण्यास टाळाटाळ केल्यामुळे ग्राहक न्यायालयाने कंपनीला 19 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
तक्रारदार कमलेश मुथा (रा. थेरगाव, पुणे) यांनी जय मोबाईल झोन (नितीन कॉम्प्युटर, कमला आर्केड, पिंपरी) येथून दिनांक 21 जून 2014 मध्ये 12 हजार 100 रूपयांचा लेनोव्हो कंपनीचा मोबाईल विकत घेतला होता. परंतु तो आठच दिवसात बंद पडला. यामुळे मुथा यांनी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला मोबाईल दिला. परंतु तेथे मोबाईलचे पार्ट शिल्लक नाहीत दहा दिवसांनी या असे सांगण्यात आले. दहा दिवसांनंतर मुथा यांनी मोबाईल दुरूस्त झाला आहे का? याची विचारणा केली. सर्व्हिस सेंटरने दुरूस्ती झाले नसल्याचे सांगत सदर मोबाईलची रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. आणि त्यांच्याकडून मोबाईलचे सर्व कागदपत्रे आणि बँकेशी निगडीत कागदपत्रे घेण्यात आले. वेळो वेळी त्यांनी कंपनीशी रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. शेवटी मुथा यांना कोणतीच नुकसान भरपाई मिळत नसल्याचे लक्षात आले आणि त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.
कंपनी विरोधात ग्राहक न्यायालयात धाव
कमलेश मुथा यांनी कोणत्याही वकिलाच्या शिवाय लेनोव्हो कंपनी विरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार केली. यावेळी न्यायालयाने झालेल्या सर्व प्रकाराची माहिती घेतली. तसेच दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत कंपनीला मोबाईलची रक्कम 12 हजार 100 रूपये 6 टक्के व्याज दराने दिनांक 14 जुलै 2014 पासून प्रत्यक्ष अदा करेपर्यंत द्यावी, तक्रारदारांना झालेल्या त्रासासाठी 5 हजार नुकसान भरपाई, तक्रारीच्या खर्चासाठी 2 हजार द्यावी असा निर्णय ग्राहक न्यायालय मंच्याच्या वतीने ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष एम. के.वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी दिला. कंपनीच्या वतीने लेनोव्हो कंपनीचे मॅनेजिंग डारेक्टर राहुल आगरवाल अ्रापली बाजू मांडली.