लेप्टोचे राज्यभरात 26 संशयित रुग्ण!

0
आतापर्यंत दोनच मृत्यू झाले असल्याचा आरोग्य विभागाचा दावा
निलेश झालटे,मुंबई: राज्यभरात लेप्टोच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत 7 जणांचा बळी या रोगाने घेतला आहे. प्रशासनाकडून मात्र लेप्टोमुळे केवळ 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला आहे तर राज्यभरात 26 संशयित रुग्णांना लेप्टोची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. प्राण्यांना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्या लघवीतून या रोगाचे जंतू असतात. सांडपाण्यात हे जंतू बरेच दिवस तग धरतात, त्यामुळे याची लागण लोकांना होते. लेप्टोची लागण झाल्यामुळे आतापर्यंत मुंबईत 7 जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, या रोगामुळे दोघांचा बळी या रोगामुळे झाला असून राज्यभरात 26 संशयित रुग्ण आहे.
डेंग्यूचाही राज्यात कहर!
पावसामुळे आणि सांडपाण्यामुळे तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन राज्यात डेंग्यूचा देखील प्रभाव असल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी धुमाकूळ घालून अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने यावर्षी देखील आपले तोंड उघडले आहे. आतापर्यंत डेंग्यूमुले एकाचा मृत्यू झाला आहे तर राज्यभरात 1091 संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. डेंग्यूसोबतच
मलेरियाचे देखील 3098 रुग्ण राज्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लेप्टाचे आतापर्यंतचे मुंबईतले बळी 
जून महिन्यात झालेल्या पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी काही सखल भागात पाणी साचल्याने अशा पाण्यातून बाधा झाल्याने 26 जूनला कुर्ला येथील 15 वर्षीय मुलाचा लेप्टोने बळी घेतला. लगेच दुसर्‍या दिवशी 27 जूनला गोवंडी येथील 27 वर्षीय तरुणाचा आणि त्याच दिवशी मालाड येथील एका 21 वर्षीय महिलेचाही लेप्टोने बळी घेतल्याची घटना समोर आली. जुलै महिन्यात आतापर्यंत तीन जणांचे लेप्टोमुळे प्राण गेले. वरळी येथे राहणार्‍या 17 वर्षीय मुलाचा शनिवारी मृत्यू झाला तसेच प्रतीक्षानगर येथील 42 वर्षीय नागरिकाचा सायनच्या सोमय्या रुग्णालयात मृत्यू झाला. 27 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. भांडुप पूर्व इथे राहणार्‍या सिद्धेश माणगावकर या व्यवसायाने इंजिनीअर असणार्‍या तरुणाचा लेप्टोस्पायरसीस मुळे मृत्यू झाला आहे.