लेवा जल्लोष – २०२० बुलढाणा येथे उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
बुलढाणा | प्रतिनिधी | जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेवाशक्ति सखीमंचतर्फे आयोजित ‘लेवा जल्लोष-२०२०’ कार्यक्रम बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पुणे, बुलढाणा, खामगाव व अकोला येथे पार पडलेल्या लेवा सौदर्य स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या प्रत्येकी दोन विजेत्यांचा रॅम्प वॉक, प्रश्नमंजूषा यासह नृत्य, नाटिका, भारुड, ऑर्केस्टा आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात रंगत आणली. यावेळी लेवा सम्राज्ञीची निवड करण्यात आली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी मिसेस इंडिया प्रचिती पुंडे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियासुद्धा आज घरात व घराबाहेर पुरूषांच्या बरोबरीने काम करतात त्यांचा सन्मान करण्यासाठी लेवाशक्ति सखी मंचतर्फे भातृमंडळ, बुलढाणा सभागृहात लेवा जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून भातृमंडळाचे अध्यक्ष डी.टी.खाचणे, सचिव डी. के.देशमुख, सिद्धीविनायक समुहाचे संचालक किरण चौधरी, सिद्धीविनायक समुहाचे उपाध्यक्ष सुनिल झांबरे, व्ही.डी.पाटील, दिलीप नाफडे, कालिंदी कोलते, प्रा.देवबा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने झाली. गणेशवंदनेनंतर लेवाशक्ती मंचच्या अध्यक्षा रेखाताई भोळे यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी कार्यक्रम आयोजन करण्यामागचा भूमिका विषद केली. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. सूत्रसंचलन नयना पाटील व वैभवी कोलते यांनी करत कार्यक्रमात रंगत आणली. आभार कुंदाताई पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखाताई भोळे यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाण्याच्या कुंदाताई पाटील, किरणताई पाचपांडे, रजनी बोंडे, गौरी सरोदे, नीता वायकोळे, जयश्री पाटील, नयना पाटील, रेणुका टेकाडे, रेखा पाटील, स्नेहल तुपे, रेवती पाटील, पूनम देशमुख, हर्षा वराडे, उषा वराडे, कल्पना किनगे, सुवर्णा लोखंडे, सविता खर्चे, स्मिता खर्चे, मनिषा नारखेडे यांच्यासह लेवाशक्ति सखी मंच बुलडाणाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
खामगावच्या मोनाली सरोदे ठरल्या लेवा साम्राज्ञी
पुणे, बुलढाणा, खामगाव व अकोला येथे लेवा सौंदर्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात सहभागी झालेल्या १०० पेक्षा जास्त महिलांमधून प्रत्येक जिल्ह्यातून दोन जणींची निवड करण्यात आली होती. या आठही महिला स्पर्धकांची बुलढाणा येथे अंतिम फेरी पार पडली. यात रॅम्पवॉक व प्रश्नमंजुषाच्या माध्यमातून खामगावच्या मोनाली बिपीन सरोदे यांची लेवा साम्राज्ञी म्हणून निवड करण्यात आली. त्यांची निवड होताच उपस्थित महिलांनी एकच जल्लोष करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. स्पर्धेतील सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचाही आगळ्यावेगळ्याप्रकारे सन्मान करण्यात आला. परिक्षक म्हणून साहित्यिक क्षेत्रातील लिलाताई गाजरे व सामाजिक क्षेत्रातील निशा अत्तरदे आणि भाग्यश्री पाचपांडे यांनी काम पाहिले. यावेळी मिसेस इंडिया प्रचीती पुंढे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अॅड. जयश्री शेळके, भाजप शहर अध्यक्षा विजया राठी, डॉ.वैशाली, सौ.भुजबळ, जिल्हा ग्राहक मंचच्या जयश्री राखोंडे व स्वाती कस्तुरे उपस्थित होत्या.
कलागुणांचे प्रदर्शन करत फोडली सामाजिक प्रश्नांना वाचा
लेवा जल्लोष २०२० या कार्यक्रमात महिलांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. यावेळी सादर झालेल्या नृत्य, गायन, प्रश्नमंजुषा आदींमधून त्यांनी स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार, अॅसिड हल्ले, मोबाईलचे दुष्परिणाम आदी विषयांवर निर्भिडपणे मते मांडली. तसेच कार्यक्रमाच्या प्रारंभी लेवाशक्ति सखीमंचच्या सदस्यांनी काढलेली रॅली संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली. यामध्येे स्त्री सशक्तीकरणासह जनजागृतीपर घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले. लेवाशक्ति सखी मंच, बुलढाणातर्फे आयोजित या कार्यक्रमामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास तर वाढलाच मात्र त्यांचा योग्य सन्माननही झाला, अशा शब्दात आयोजकांचे कौतुक करण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
या कार्यक्रमात बुलढाण्याचे दिलीप हरीभाऊ नाफडे यांना कृषीभूषण, अकोला येथील डॉ. सौ.कालिंदी अनंत कोलते यांना उद्योगभूषण, खामगावचे प्रा.देवबा शिवाजी पाटील यांना साहित्यभूषण, कुंड, धरणगावच्या कु.खुशी मिलींद पाचपांडे यांचा क्रीडाभूषण तर लग्नानंतर शिक्षण पूर्ण करत एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होणार्या अकोल्याच्या नयना अनंत खर्चे यांना लेवाशक्ति विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.