लेवाशक्ती सखी मंचातर्फे प्रेमलोक पार्कमध्ये पाककला स्पर्धा

0

पिंपरी (प्रतिनिधी) – नाविन्यपूर्ण पाककला संस्कृती ऐतिहासिक वारसा जपणारी आहे. महिला-भगिनींनी शेकडो वर्षांनंतरही ही खाद्यसंस्कृती जपलेली आहे. काळानुसार त्यामध्ये योग्य तो बदलही केले आहेत. अशा पाककलेच्या गुणांना राज्यपातळीवर व्यासपीठ मिळविण्यासाठी सखी मंचातर्फे सध्या विभागवार पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. मूग आणि तांदूळ यावर आधारीत पदार्थांची विविधता असा विषय या स्पर्धेमध्ये देण्यात आला होता. लेवाशक्ती सखी मंचाची पाककला स्पर्धेमध्ये प्रेमलोक पार्क दळवीनगर येथून बहुसंख्य महिलांनी भाग घेतला होता.

यामध्ये मूग डाळ घावन, मूग डाळ पकोडे, डिप फ्राय, पुदीना कोथिंबिर चटणी, मूग पालक पकोडे, मूग भजी, राईस, नूडल्स, मूग डाळ, खमंग ढोकळा, तांदूळ कचोरी, पौष्टीक आप्पे, मूग पनीर पकोडा, बिटाचे मोदक, मूगाचे लाडू, उकडीचे मोदक असे अनेक पौष्टीक व उत्तम पदार्थ बनविलेले होते. यामध्ये संध्या महाजन, अश्‍विनी महाजन, सीमा लोखंडे, स्वाती पाटील, सुषमा महाजन, स्वाती पाटील, सुनिता इंगळे, अश्‍विनी महाजन अशा लेवा भगिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता.

चविष्ट व पौष्टीक पदार्थ
यावेळी बहिणाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया जंगले व खजिनदार सुनीता पाटील या दोघींनी पाककला स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहीले. त्यावेळी परिक्षक म्हणाल्या की, आज लेवाशक्ती सखी मंचातर्फे प्रेमलोक पार्कमध्ये घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेमध्ये महिलांनी मूग डाळ व तांदूळ यापासून बनविलेले पदार्थ सादर केले. विविध प्रकारचे गोड व तिखट पदार्थ कौशल्याने बनविले. मुलांच्या परीक्षा, शाळा सांभाळून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बर्‍याच महिलांनी 2-2 पदार्थही करून आणले होते. हे सर्व पदार्थ अतिशय चविष्ट व पौष्टीक होते. गोडापेक्षा तिखट पदार्थ म्हणजे चटपटीत पदार्थ बनविण्याकडे महिलांचा जास्त कल होता.

महिलांना प्रोत्साहित करणार
लेवाशक्ती सखी मंचाच्या रेखा गोळे म्हणाल्या की, पौष्टीकता, कमी तेल वापरून केलेले तसेच फायबरयुक्त पदार्थ या निकषावर पदार्थांचे परिक्षक केले गेले. तसेच त्या पदार्थांचे परिक्षक केले गेले. या पदार्थांचे सादरीकरण सजावट यासाठी वापरण्यात आलेले घटक, चव यांचा विचार करून गुण देण्यात आले आहेत. सर्व पदार्थ खूप चविष्ट होते. लेवा शक्ती सखी मंचाच्या कार्यकर्त्या महिलांनी तर बनविणार्‍या महिलांना ऑर्डर घेणार का, म्हणून विचारले. खरोखरच एक-दोघी गृहिणींना सोबत घेऊन व्यवसाय करण्यास हरकत नाही. यासाठी मंच प्रत्येक महिलेला प्रोत्साहित करणार आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.

घर-संसार सांभाळून आवड जपतात
प्रत्येक विभागानुसार असे आयोजन लेवाशक्ती सखी मंच आयोजित करण्यात येत आहे. यासाठी रेखा भोळे, गौरी सरोदे, किरण पाचपांडे, विभावरी इंगळे, चारूलता चौधरी या सर्व भगिनींनी खूप मेहनत घेतली आहे. आपल्या भगिनींना चांगले व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे. यावेळी सिद्धीविनायक ग्रुपच्या कांचन ढाके यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही या महिला स्पर्धकांचे कौतुक केले. घर-संसार सांभाळून महिला घराबाहेर पडायला लागल्या आहेत. वेगवेगळे पदार्थ बनविण्यामध्ये आवड निर्माण करत त्या तसे प्रयोग करतात, असे ढाके म्हणाल्या.