लेवा भवन परिसरातून गाय चोरीचा प्रकार उघड

0

जळगाव । लेवा भवनच्या आवारात दावनीला बांधलेली गाय चोरून नेत काट्याफाईल भागात एका कासाईकडे विक्री केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. दरम्यान, नगरसेवक विष्णु भंगाळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याची ओळख पटवली. शनिवारी चोरटा व त्याच्या साथीदारांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा चोरटा कोंडवाड्यात काम करणारा कर्मचारी आहे. तर चोरट्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे पटली ओळख
रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊन नंतर संबधित मालकाकडून दंड वसूल करण्यात येता. मात्र, दावनीला बांधलेली गाय चोरून नेत कसाईला विकल्याचा धक्कादायक प्रकार कोंडवाड्याच्या कर्मचार्‍याने केला असल्याचे उघड झाले आहे. गुरूवारी दुपारी 2 वाजता लेवाभवन परिसरात दावनीला बांधलेली गाय मुन्ना नामक तरूणाने पळवून नेली. सुरक्षारक्षकांच्या कुटुंबातील महिलांनी आरडा-ओरड करून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने मागे वळुन न पाहता गाय घेवून निघून गेला. महिलांनी हा प्रकार नगरसेवक विष्णू भंगाळे यांना सांगीतला. भंगाळेंनी त्याच दिवशी परिसरातील काही दवाखान्यांच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये मुन्ना हा गाय घेऊन जात असताना दिसून आला. तसेच त्याला मदत करणारे दोघे देखील दिसले. अडचण येऊ नये म्हणून दोघे रस्त्यावर वॉच ठेऊन होते. हे फुटेज मिळाल्यानंतर भंगाळे यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. फुटेजवरून तीघांची ओळख पटवण्यात आली. शनिवारी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यानंतर भंगाळे यांनी काट्या फाईल परिसरात जाऊन गायीची सुटका केली.