जिनेव्हा । भारताचा ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्णाने सनसनाटी विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या आर्मेनियाचा ग्रॅण्ड मास्टर लेवॉन अरोनिअनला पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे गुणतालिकेत हरिकृष्णाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
लेवॉनचा अंदाज चुकल्याचा हरिकृष्णाला मिळाला फायदा
जागतिक क्रमवारीत 22 व्या क्रमांकावर असलेल्या हरिकृष्णाने काळ्या सोंगट्यानी बचाव करताना खेळात चांगला ताळमेळ राखला होता. ऐन मोक्याच्यावेळी लेवॉनने केलेल्या चुकीचा पुरेपुर फायदा उचलत हरिकृष्णाने विजय नोंदवला. स्पर्धेतील सहाव्या फेरीअखेर दोन विजय आणि चार बरोबरीनंतर हरिकृष्णाच्या खात्यात चार गुण जमा आहेत. या फेरीनंतर हरिकृष्णा अॅलक्झांडर ग्रिचूक आणि तैमुर राद्जाबोव्हशी संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. सातव्या फेरीत हरिकृष्णाचा सामना अॅलेक्झांडरशी होणार आहे. सामन्यानंतर हरिकृष्णा म्हणाला की, खेळलेल्या एका चालीचा लेवॉनला अंदाज लावता आला नाही, त्याचा फायदा मला मिळाला.