ले. कर्नल पुरोहित मुंबई हेडक्वार्टरला असणार

0

मुंबई । मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कोर्टातील जामीन मंजुरीचा आदेश सादर करत सैन्यदलाच्या मुंबईतील मुख्यालयात रुजू होण्याची शक्यता आहे. कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने 9 वर्षांनी जामीन मंजूर केला. सप्टेंबर 2008 मधील मालेगाव स्फोटानंतर कर्नल पुरोहित यांना लष्करी सेवेतून निलंबित करण्यात आले होते, मात्र दोष सिद्ध न झाल्यामुळे त्यांना आजही 75 टक्के पगार आणि भत्ते मिळतात.

मुख्यालयात झालेली अटक
पुरोहित हे 1994 साली सैन्यामध्ये रुजू झाले होते. मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांना देशसेवेची संधी मिळाली. चेन्नईतल्या प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग थेट काश्मीरमध्ये करण्यात आली. पण आजारी पडल्याने त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या गुप्तचर खात्यात पाठवण्यात आले. मात्र 2008 च्या मालेगाव स्फोटाचे धागेदोरे कर्नल पुरोहितांकडे पोहोचल्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातल्या पंचमढीतल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

जबाबदारीवर अनिश्‍चितता
तांत्रिकदृष्ट्या कर्नल पुरोहित हे आजही लष्करी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे ते पुन्हा रुजु झाल्यानंतर त्यांची बदली होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यांना रुजु करुन घ्यायचे की कार्यालयीन काम सोपवायचे, तसेच त्यांना प्रत्यक्ष लष्करी गणवेश परिधान करु द्यायचा की नाही, अशा अनेक मुद्यांवर सैन्य प्रशासन निर्णय घेईल. मला माझ्या कुटुंबाला भेटायचे आहे. एक माझी लष्करी सेवा व दुसरे माझे स्वत:चे कुटुंब, असे लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित म्हणाले.