नवी दिल्ली- सध्या बॉलीवूडसह इतर क्षेत्रात #Me Too मोहिमेला वेग आले आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा या माध्यमातून फोडले जात आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपांच्या फैरी झालेले परराष्ट्र राज्य मंत्री व माजी पत्रकार एम. जे. अकबर लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. जोपर्यंत अकबर त्यांच्यावरील लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमधून निष्कलंक बाहेर येत नाहीत तोपर्यंत त्यांनी पदावर राहू नये अशी भाजपाची भूमिका आहे. अर्थात, अद्याप अधिकृतरीत्या काहीही जाहीर करण्यात आले नसले तरी अकबर यांना वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देण्यास सांगण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/priyaramani/status/1049279608263245824
सध्या अकबर हे नायजेरियाच्या दौऱ्यावर असून ते लवकरच भारतात परतणार आहेत. आल्यावर ते राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पत्रकारितेच्या दीर्घ कारकिर्दीमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करत नवीन महिला पत्रकारांचा गैरफायदा घेत लैंगिक छळ केल्याचा आरोप अनेक महिलांनी केला आहे. हॉटेलमध्ये रात्री अपरात्री बोलावणे, केबिनमध्ये कारण नसताना बोलावून लगट करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर काही महिला पत्रकारांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. विशेष म्हणजे काही महिलांनी याला वाचा फोडल्यानंतर आपणहून आणखी काही महिला पत्रकार पुढे आल्या व त्यांनीही अकबर हे पशूसमान होते असे सांगत आपले दुर्दैवी अनुभव कथन केले.
वीस वर्षांपूर्वी पत्रकारितेमध्ये ऐन भरात असताना अकबर यांनी अनेक तरूण महिला पत्रकारांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होत आहे. या सगळ्यात अकबर यांना विरोध करून नोकरी सोडलेल्या अनेक पत्रकार महिला पुढे आल्या असल्या तरी तेवढे धैर्य न दाखवणाऱ्या व बळी पडलेल्या अनेकजणी असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. असे आरोप झालेली व्यक्ती राज्यमंत्रीपदावर कशी काय राहू शकते असा आरोप करत काँग्रेसनेही भाजपावर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे एम. जे. अकबर यांचा राजीनामा निश्चितच घेण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.