लैंगिक शिक्षणामध्ये पालकांची भूमिका…!

0

हल्लीची एकविसाव्या शतकातील 10 ते 12 वयोगटांतील मुले वेगळ्याच जाळ्यात अडकलेली दिसतात, असे नाही की त्या मुलांची इच्छाच नाही, की त्या जाळ्यातून बाहेर पडावे, पण अडचण ही आहे की त्यांना माहीतच नाही की बाहेर कसे पडायचे? त्यांना कोणी सांगतच नाही आणि हा आज समाजातील सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, मग यावर उपाय काय? आपला हा समाज गेल्या 15-20 वर्षांत खूप जलद गतीने बदलला आहे. इंटरनेटचे जाळे ज्या पद्धतीने पूर्ण जगभरात पसरले आहे. त्यामुळे या समाजात खूपच मोठा बदल झालेला जाणवतो. लोकांचे विचार एका वेगळ्याच दिशेला जाऊन पोहोचले आहेत, तुम्हाला जर त्या विचारांचं स्वरूप पाहायचे असेल, प्रामुख्याने तरुणांचे तर आजचे चित्रपट बघा. यू-ट्युबवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ जास्त बघितले जातात याचा विचार करणे गरजेचे आहे. लोक जे बघतात त्याचाच विचार करतात, ज्याचा विचार करतात तेच करतात. थोडा विचार करा, जर तुम्हाला पाच पावले पुढे जायचे असेल, तर त्याबद्दल विचार करावा लागेल. हा विचार कसा तयार होतो? आतापर्यंत तुम्ही जे काही बघितलं होतं त्यातील काही गोष्टींकडे तुम्ही आकर्षित होता, मग तुमच्या मनाला वाटेल की त्या सर्व कल्पनांना प्रत्यक्षात उतरवावे.

आज हा भारतातील मोठा प्रॉब्लेम आहे, एखाद्या कुटुंबात जेव्हा असले काही होत नाही तोपर्यंत पालकांना असे वाटते की, आमच्या मुलांसोबत असे काही होऊच शकत नाही, आमची मुले असे काही करणारच नाहीत आणि जेव्हा खरोखर घडते तेव्हा? प्रॉब्लेम झाल्यावर पण पालक फक्त त्याचे पोस्टमार्टम करतात. समजा एखाद्या मुलीवर गर्भपात करण्याची वेळ येईल तेव्हा पालक चिडतील, रागावतील, भांडण करतील, प्रसंगी मारझोडसुद्धा करतील. परंतु, तसे काही घडण्याआधी त्या मुलीच्या आईने, वडिलांनी, शिक्षकांनी, शाळेने, शासनाअंतर्गत लैंगिक शिक्षणामार्फत किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्या मुलीसोबत कोणीच या विषयावर कसली चर्चा केली का? असे जर असेल तर ती मुलगी चर्चा कोणासोबत करेल? अर्थातच तिला जो आवडतो, ज्याच्याबद्दल आकर्षण आहे त्याच्याशीच बोलेल ना? आणि मग तो तिला कुठे घेऊन जाईल? थोडा विचार करा. ती विचार करेल हा गॅप इतका मोठा आहे की कशाला पालकांसोबत चर्चा करू? पालक बोलायला तयार नाहीत, शिक्षक बोलू शकत नाहीत, वृद्ध लोकांना बोलायचे नाही, लाज वाटते, सर्व आपापसांत बोलत आहेत, पण खुल्याने, मुक्तपणे बोलायला कोणीच तयार नाही. मला तरी या संपूर्ण परिस्थितीवर एकच उपाय दिसतोय, पालकांना आपल्या पाल्यांच्या नजरेतून बघावे लागेल, समजून घ्यावे लागेल, त्यांच्या स्तरावर येऊन बोलावे लागेल, जेणेकरून त्यांना योग्य व अचूक मार्गदर्शन मिळेल. पालकांना प्रथम प्रॉब्लेमला समजून घ्यावे लागेल, जर तुम्ही प्रॉब्लेम समजून घेतलात तर तुम्ही असे नाही बोलणार की, ते करू नकोस तर तुम्ही असे म्हणाल की, एकतर तुझे वय 18 पेक्षा कमी आहे, एकदा 18 पूर्ण होऊ दे मग तुझी मर्जी पण…आता तुम्ही जसे पण बोलाल त्यानंतर ते पूर्ण लक्ष देऊन ऐकायला तयार होतील, कारण आता ते तुमच्याकडे एक संवेदनशील व्यक्ती म्हणून बघतील. शेवटी महत्त्वाचे काय तर…संवाद… एक सुसंवाद…चर्चा… सखोल… खुल्याने… या संवादाने काय होईल मला माहीत नाही, पण जे काही होईल ते लाखपटीने चांगले असेल.

– राजू शिरधनकर
सामाजिक कार्यकर्ता मुंबई
9324257259