लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी

0

नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात दोन टप्प्यांत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे रोजी समाप्त होत आहे. परंतु, देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेेंदिवस वाढत असल्याने अनेक राज्यांनी ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

करोनासाठी नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीने राजधानीत १६ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी पुढे वाढवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी, तेलंगणाने लॉकडाऊनचा कालावधी ७ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या सहा राज्यांनी मात्र आपण केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करू असे सांगितले आहेे. करोनामुळे सर्वात जास्त प्रभावी झालेल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील ९२ टक्के करोना रुग्ण केवळ मुंबई-पुण्याचे आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहावेत, अशी टोपे यांची मागणी आहे. परंतु, यावर पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.