जळगाव – लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी /विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले होते. असे असूनही लॉकडाऊन कालावधीमध्ये मे. क्रिश ट्रेडर्स, एफएल-१, अनुज्ञप्ती क्र. १२, नशिराबाद, ता. जि. जळगाव या अनुज्ञप्तीमधून विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ५६ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनुज्ञप्तीधारक राजकुमार शितलदास नोतवाणी व भागीदार अनिता शिरिष चौधरी यांनी लॉकडाऊन काळात दिनांक २१ व ३१ मार्च भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, मुंबई विदेशी मद्द नियम, १९५३ चे नियम १० (१) (ब), १५, १६, २१ (३) (ब), २१ (५) २२ तसेच एफएल-१ अनुज्ञप्ती शर्त क्रमांक २ व ७, महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या इत्यादि) नियम १९६९ चे नियम ९ व १४ (१) या नियमांचा भंग केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन करणार्या अनुज्ञप्तीधारक व भागीदार यांनी मुंबई विदेशी मद्द नियम, १९५३ व महाराष्ट्र विदेशी मद्द (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या) नियम १९६९ तसेच एफएल-१ अनुज्ञप्तीच्या अटी, शर्तीचा भंग केल्याचे सिध्द होत असल्याने नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्स यांचे कडील एफएल-१ अनुज्ञप्ती क्रमांक १२ कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी कळविले आहे.