भुसावळ : कोरोनाचा वाढता फैलाव पाहता जिल्हाधिकार्यांनी 7 ते 13 दरम्यान भुसावळसह जळगाव व अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिल असून या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी लोकप्रतिनिधींची बैठक झाली. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण नागरीक फिरताना दिसल्यास वा वाहने चालवताना दिसल्यास त्यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी दिला आहे. कोरोना संंक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यांची बैठकीला उपस्थिती
प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, तहसीलदार दीपक देवरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबरे, तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदी उपस्थित होते.
औषध दुकाने व डेअरी राहणार सुरू
प्रांताधिकारी म्हणाले की, 7 ते 13 जुलै या लॉकडाऊन राहणार असून या काहात केवळ शहरातील वैद्यकीय सेवा, औषध दुकाने आणि दुध डेअरी हेच फक्त सुरू राहणार आहे. या व्यतिरिक्त भाजीपाला, फळे, किराणा दुकान तसेच सर्व दुकाने बंद राहतील. कुठल्याही नागरीकाने दुचाकी घेवून घराच्या बाहेर पडू नये तसेच दुचाकीवर दिसल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांकडून कठोर कारवाई : दिलीप भागवत
शहरात 7 ते 13 दरम्यान संचारबंदी राहणार असून या काळात अनावश्यकरीत्या नागरीक घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल शिवाय दुचाकी वा चारचाकी वाहनाचा वापर केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून पोलिस शोभेसाठी नाहीत त्यामुळे नागरीकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी घरातच थांबावे, असे आवाहन बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले.
कामावर जाणार्यांनीच पडावे बाहेर : आमदार
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत असून पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त राहणार असल्याने नागरीकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले. नोकरदार वा कामावर जाणार्यांनीच घराबाहेर पडावे व सोबत ओळखपत्र बाळगावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दुध डेअरीवर दुचाकी नेण्यास मनाई
संचारबंदीच्या काळात सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते सात या काळात शहरातील दूध डेअरी सुरू ठेवता येणार असल्यातरी नागरीकांना तेथे दुचाकी नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरीकांनी पायीच डेअरीवर जावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.