जळगाव : लॉकडाऊनमुळे नागरिक घरात असल्याने चोरट्यांनी शहरातील मंदिराकडे आपला मोर्चा वळविला आहे. गणेश कॉलनी परिसरातील ख्वॉजामिया दर्गातील दानपेटी चोरुन नेल्याची घटना ताजी असतांना चोरटयांनी शिवाजीनगर परिसरातील श्री महावीर दिगंबर जिन चैत्यालय ट्रस्टच्या शांतीनाथ डिगंबर जैन मंदिरात सलग दोन दिवस चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. या मंदिरात चोरट्यांनी दोन दिवस चोरी करत मंदिरातील तांब्याचे 300 कलश व एक पितळी समई असा एकूण 16 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. दरम्यान यापूर्वी या मंदिरात तीन वेळा चोरीचा प्रकार घडला आहे.
मंदिराचे पुजारी यांच्यामुळे घटना उघड
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजीनगर परिसरातील शांतीनाथ डिगंबर जैन मंदिराचा गाभा बंद आहे. प्रमोद हिरालाल जैन वय 55 रा. शिवाजीनगर हे मंदिराचे पुजारी आहे. तेच फक्त पूजाविधीसाठी मंदिर उघडत असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास पुजारी जैन यांनी पूजाविधीसाठी मंदिर उघडले असता त्यांना मंदिराच्या गाभा असलेल्या दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर गुरुवारी पुजारी जैन यांनी सकाळी 5.30 वाजता मंदिर उघडले असता मंदिराच्या सभागृह असलेल्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. सलग दोन दिवसाच्या प्रकारानंतर पुजारी जैन यांनी प्रकार मंदिराच्या ट्रस्टींना ट्रस्टी प्रदिपकुमार सुरेंद्रनाथ जैन व राजेश जैन यांना कळविला. तसेच मंदिरात पाहणी केली असता, मंदिराच्या हॉलमध्ये असलेले 15 हजार रुपये किमतीचे 300 तांब्याचे कलश तसेच गाभार्यात असलेली एक हजार रुपये किमतची पितळी समई असा ऐवज एकूण 16 हजार रुपयांचा ऐवज लांबविले असल्याचे समोर आले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत कैद
प्रदिपकुमार जैन यांनी परिसरातील फुटेज तपासले असता बुधवारी दोन इसम मंदिर परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. तर मध्यरात्री मंदिराजवळ तीन संशयीत इसम फिरत असताना दिसून आले. सदर फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या पूर्वी या मंदिरात तीन वेळी चोरी झाल्याची माहिती प्रदिपकुमार यांनी दिली. याप्रकरणी पुजारी प्रमोद जैन यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विजय निकुंभ करीत आहेत.
अरे देवा…आता मंदिरांमध्येही चोरी
कोरोनाने राज्यभरात थैमान घालते आहे. त्यामुळे अत्यावश्याक सेवा वगळता सर्व दुकाने तसेच आस्थापना बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिक घरीच थांबून आहे. नागरिक दिवसरात्र घरात असल्याने चोरट्यांनी मंदिरांकडे मोर्चा वळविला आहे. 5 मे रोजी ख्वॉजामिया दर्गातील दानपेटी लांबविल्याचा प्रकार घडला होता. यातील संशयित अटकेत असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतांना चोरट्यांनी बुधवार व गुरुवारी शिवाजीनगर परिसरातील जैन मंदिर लक्ष्य केले. व तांब्याच्या व पितळाच्या साहित्य असा 16 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.