नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात फैलाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन करण्यात आले होते. याला अपेक्षित प्रतिसाद लाभला, मात्र प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले जात नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. करोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे, मात्र काही लोक याला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत मोदींनी लॉकडाऊन गांभीर्याने घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका असे आवाहन केले आहे. ट्विटद्वारे मोदींनी सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे देशभरातील नागरिकांना आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यू ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रविवारीच दिला. परंतु आज पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढण्याला सुरुवात झाली आहे.