लॉकडाऊन काळात संविधान जागर अभियान

0

जळगाव- संविधान घरांघरात-संविधान मनांमनात हा संदेश घेऊन लॉकडाऊन काळात संविधान जागर अभियान राबविण्यात येत आहे.संविधानाचा ऑनलाईन अभ्यास करून घेऊन राज्यभरातील किमान १ लाख लोकांची येत्या संविधान दिनी (२६ नोव्हेंबर रोजी) संविधानावर आधारित ऑनलाईन परिक्षा घेण्याचे नियोजन या अभियानात आहे.

महाराष्ट्र राज्य संविधान जागर अभियान समितीचे प्रमुख संयोजक विवेक ठाकरे व सहसंयोजक सुमित बोदडे यांनी ही लॉकडाऊन काळात या संकल्पनेवर काम सुरू केले आहे. समितीच्या वतीने कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सोशल मीडियाचा वापर करून जनजागृतीच्या आधारावर सहभागी झालेल्यांना ऑनलाईन ई-संविधान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मराठी,इंग्रजी व हिंदी माध्यमातून ई-संविधानाच्या अभ्यासार्थीना संविधानावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा देता येईल.यातून गुणवत्ता यादीत यश मिळवणाऱ्यांना  (१) संविधान कोहिनुर,(९) संविधान नवरत्न,(२५) संविधान माणिक व १०० जणांना संविधान मोती याप्रमाणे पारितोषिके व सहभागी सर्वांना संविधानमित्र ऑनलाईन पदविका प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.

■ संविधानाची मूल्ये रुजवण्यासाठी अभियान

महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग व पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेच्या वतीने फक्त १५ टक्के रक्कम स्वीकारून ८५ टक्के सवलतीच्या दरात भारतीय संविधान विक्रीस उपलब्ध करून देण्यात आलेले असतांना सुद्धा आपल्या लोकशाही देशाचा सर्व गाडा ज्यावर आधारित आहे अशा भारतीय राज्यघटनेचा परिपूर्ण अभ्यास त्यामानाने होत नाही.स्पर्धा परिक्षा सोडून इतर मार्गांनी शासनाच्या सेवेत असलेल्या केवळ ०.११ टक्के  शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान वाचल्याचा धक्कादायक अहवाल आमच्या समितीच्या ऑनलाईन सर्वेक्षणातून पुढे आल्याने जास्तीत-जास्त लोकांनी संविधान वाचावे व अभ्यासातून संविधानाची मूल्ये रुजावीत हा या अभियानातील मुख्य उद्देश आहे.

विवेक दे. ठाकरे
 (मुख्य संयोजक)
 संविधान जागर अभियान समिती

■ सामाजिक न्याय विभागाला सहभागी करून व्याप्ती वाढवणार-
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाला सोबत घेऊन अभियानाची व्याप्ती वाढवण्याची कार्यवाही सुरू आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारी, प्राध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,राज्यातील विविध विद्यापीठातील आणि १० वी,१२ वी चे शिक्षणक्रमातील विद्यार्थी, राज्यातील पोलीस पाटील, सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक व सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाचे लोकप्रतिनिधी, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी,सहकारी संस्था, व्यापार-उद्योग व खाजगी संस्था,पत्रकार आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी या घटकांत जनजागृती करून संविधान दिनी एकाच वेळी संविधानावर आधारित परीक्षेत किमान १ लाख परीक्षार्थीना सहभागी करून घेऊन आगळा-वेगळा विक्रम नोंदविण्याचे अभियानामागील ध्येय आहे.

– सुमित बोदडे
  (सहसंयोजक)
  संविधान जागर अभियान समिती