लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने काढणार!

0

नवी दिल्ली – देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांचा गोंधळ उडू नये यासाठी नियोजन करण्याचे काम केंद्रीय पातळीवर युध्दपातळीवर सुरु आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपवताना ते एकदमच उठवणे शक्य नाही. त्यामुळे पहिल्यांदा लॉकडाऊन सीमित स्वरुपात उठवून त्यानंतर टप्प्याटप्प्याने उठविण्याचे संकेत शासनाकडून देण्यात आले असून करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांवर मात्र ही बंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊन १४ एप्रिलपुढेही वाढवले जाणार का? यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा संपर्क संपूर्णत: बंद ठेवावा तसेच लहान मुले आणि वृद्धांना घरीच राहण्याचा संदेश दिला जावा, असेही मुद्दे चर्चेदरम्यान समोर आले. करोना फैलावच्या दृष्टीनं रेल्वे बंद राखण्याचा निर्णय पुढेही काही दिवस कायम ठेवला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. परंतु, मर्यादित स्वरुपात काही रेल्वे सुरू करण्याच्या माहितीवर मात्र अधिकार्‍यांनी नकार दिलेला नाही. इतर सरकारी आणि खासगी गाड्या, बाईक यांवर स्थिती पाहून सरकार निर्णय घेणार आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्याचा पर्यायही १५ एप्रिलनंतर लगेचच सुरू होईल अशी शक्यता कमीच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यालय सुरू करण्यावरही चर्चा झाली. ज्या ज्या भागांत करोनाचा प्रभाव दिसून आलेला नाही अर्थात जे विभाग करोना हॉटस्पॉट नाहीत अशा भागांत सरकारी विभाग हळूहळू सुरू केले जाऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचवले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर करता येतील अशा सगळ्या कामांची चाचपणी येत्या ८ दिवसांत करण्याचे आदेश सगळ्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, अशा ६२ जिल्ह्यांत लॉकडाऊन २८ दिवस अर्थात १२ मेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्यात आला आहे.