लॉकडाऊन तरीही महिनाभरात कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये 300 ने वाढ

मार्च महिन्यात 240 तर एप्रिलमध्ये 559 रूग्णांचा मृत्यू

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. 15 मेपर्यंत लॉकडाऊनचे विशेष कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. असे असतांना जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या रोज हजाराच्या पटीत वाढत आहे. तसेच दर दिवशी सरासरी 20 ते 21 रूग्णांचा मृत्यू होत आहे. दरम्यान गेल्या महिनाभरात रूग्णांपाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांच्या संख्येत तब्बल 319 ने वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात जळगाव जिल्हा हा कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट आहे. दुसर्‍या लाटेत रोज हजारांच्या पटीत रूग्ण बाधित झाल्याचे आढळुन येत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातही दि. 15 मेपर्यंत विशेष कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. तरी देखिल रूग्णसंख्या आटोक्यात येत नाहीये. प्रशासनाकडुन करण्यात येत असलेल्या उपाययोजना फारशा प्रभावी ठरत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सकाळी 7 ते 11 या कालावधीत जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरू ठेवला आहे. नेमके या चार तासातच गर्दीचा अक्षरश: महापूर वाहत असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे.

गर्दीवर नियंत्रणच नाही
लॉकडाऊन काळात जिवनावश्यक वस्तुंचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच गर्दी न करण्याचेही आदेश आहेत. मात्र सकाळच्या सुट दिलेल्या कालावधीत शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थाही सुरू राहील्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनासह पोलीसही सपशेल अपयशी ठरत आहे.

पोलीस बंदोबस्त नावालाच
जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त दिसतो खरा मात्र कुठेही गर्दीवर नियंत्रण मिळवतांना कर्मचारी दिसून येत नाही. तसेच रात्रीच्या वेळीही नागरिकांना घराबाहेर पडण्यापासून रोखले जात नाही.

कोरोना पाठोपाठ मृत्यूचाही आकडा वाढला
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येपाठोपाठ मृत्यू होणार्‍या रूग्णांचाही आकडा वाढत आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात 240 रूग्णांचा मृत्यू झाला होता. अवघ्या महिनाभरात मृत्यू होणार्‍या रूग्णसंख्येत तब्बल 319 ने वाढ झाली असुन एप्रिल महिन्यात तब्बल 559 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात दि. 19 रोजी 24, दि. 27 रोजी 23, आणि दि. 18 रोजी 22 या तीन दिवशी सर्वाधिक कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण फेल
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हीर आणि टॉसीलीझुमाब या इंजेक्शनवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे नियंत्रण आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली ह्या इंजेक्शनचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. मात्र असे असतांनाही कोरोना बाधित रूग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर इंजेक्शन उलपब्ध होत नसल्याने रूग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांचेही नियंत्रण फेल ठरत असल्याचे दिसून येत आहे.

रूग्णांच्या मृत्यूचे ऑडीट सुरू
जिल्ह्यात कोरोना रूग्णांपाठोपाठ मृत्यू होणार्‍यांची संख्या वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी दैनंदीन डेथ ऑडीट केले जात असून काही सुधारणा देखिल केल्या जात आहेत. लॉकडाऊन मार्च महिन्याच्या 15 तारखेनंतर जाहीर झाला. त्याचे चांगले परिणाम येत्या 15 दिवसात दिसणे अपेक्षित आहे. इंजेक्शनवर नियंत्रण असले तरी जिल्ह्याती मागणी ही 1600 व्हायल्स आहे. शासनाकडुन जिल्ह्याला 500 ते 600 व्हायल्स मिळतात. एप्रिल महिन्यात मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी येत्या काही दिवसात हे चित्र नक्कीच बदलेल.
अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव.
तारीखनिहाय मृत्यू झालेले रूग्ण