जळगाव ऑरेेंज तर धुळे, नंदुरबार ग्रीन झोनमध्ये
मुंबई: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने रेड, ऑरेंज, ग्रीन अशा तीन झोनमध्ये राज्यातल्या जिल्ह्यांची विभागणी केली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलं आहे. ग्रीन झोनमध्ये धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीचा समावेश आहे.
कोरोनाचे १५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून त्यापेक्षा कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची दाट शक्यता आहे. तर ऑरेंज झोनमधल्या जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. वाहतुकीत सवलत देण्यात येईल. तर ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळेल. इथले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाण्याची शक्यता आहे.