लॉकर न तुटल्याने एटीएम मशीनमधील लाखो वाचले : अंतुर्लीतील धक्कादायक प्रकार

लाखोंची रोकड मात्र सुरक्षित : लॉकर तुटल्याने एटीएम मशीनचे 25 हजार रुपयांचे नुकसान : अज्ञाताविरोधात गुन्हा

Attempt to break Central Bank ATM in Anturli village मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शनिवारी रात्री 11.45 ते 12 वाजेदरम्यान हा प्रकार घडला असून अज्ञाताचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

एटीएम फोडण्याच्या प्रयत्नाने उडाली खळबळ
अंतुर्ली गावात सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम असून शनिवारी रात्री 11.45 ते 12 दरम्यान मंकी कॅप घातलेल्या अज्ञात इसमाने एटीएममध्ये प्रवेश करीत फंडलॉक व इलेक्ट्रॉनिक लॉक तोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने लॉक न तुटल्याने लाखोंची रोकड सुरक्षित राहिली मात्र या प्रकारातील एटीएम मशीनचे 25 हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार रविवारी सकाळी ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर बँक प्रशासन व पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
जळगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक प्रताप शिकारे, एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, उपनिरीक्षक शेवाळे आदींनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक अमृतांश मुकेश (33, स्वामी समर्थ कॉलनी, अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.