जळगाव : सर्वत्र लॉक डाउन असुन चोरट्याने आता घरे सोडून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांकडे आपला मोर्चा वळविला आहे. सोमवारी सराफ बाजारातील धान्य दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुळाच्या बारा भेल्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे कृऊबात तब्बल २२ सुरक्षा रक्षक तैनात असतांना चोरट्यांनी डल्ला मारला.
कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी संकुलात लक्ष्मीकांत रामपाल मणियार (52 रा. गणेशवाडी) यांचे ७ क्रमांकाचे ललीत ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी दूकान बंद केल्यानंतर बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये गुळाच्या भेल्या मोजून ठेवलेल्या होत्या. मंगळवारी सकाळी आठ वाजता मणियार दुकानात आले असता १२ गुळाच्या भेल्या कमी आढळून आल्या. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली . याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गायकवाड,सतीश गरजे व महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.
२२ सुरक्षारक्षक असतांना चोरी
मार्केटमध्ये जवळपास रात्रीच्या वेळेस बावीस सुरक्षारक्षक हे ड्युटी करीत असतात तरीसुद्धा चोरी झाली आहे. मार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तू उघड्यावर असतात. त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.