भुसावळ : सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत, विद्यार्थी अडीच महिन्यांपासून घरात अडकलेले आहेत. या काळात लॉकडाऊनचा उपयोग करत राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेत सहभागी होऊन शोधनिबंध सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी असून त्याचा उपयोग केला पाहिजे, अशा प्रकारचे प्रतिपादन राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेचे गव्हर्निंग बॉडी मेंबर किशोर राजे यांनी केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परीषद जळगाव, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विपनेट क्लब, वरणगाव व डॉ.सी.व्ही.रमण विपनेट क्लब, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक व बाल वैज्ञानिक यांच्यासाठी झूम अॅपद्वारे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनाला जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन व जळगाव जिल्हा परीषदेचे जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक बी.डी.धाडी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेच्या उपक्रमात सहभागी व्हावे
यावेळी बोलताना किशोर राजे म्हणाले की, विद्यार्थी घरांमध्ये सध्या कंटाळले आहेत. विविध खेळ, मोबाईल संगणकावरील गेम यामुळे त्यांच्यात पठारावस्था निर्माण झाली आहे. शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांना अभ्यासामुळे वेळ नसतो यामुळे इतर शैक्षणिक उपक्रमाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते याकरीता विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेच्या उपक्रमात सहभागी होऊन या वर्षाच्या विषयावरती शोधनिबंध तयार करण्याचे मार्गदर्शन पीपीटीद्वारे यावेळी केले तसेच प्रकल्प तयार करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे या परीषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास मदत होऊन शोध निबंध तयार करण्याची सवय जडते. परीषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नामवंत शास्त्रज्ञासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी उपलब्ध होत असते, शालेय अभ्यासक्रमाव्यतिरीक्त इतरही उपक्रमात सहभागी होण्याची संधी या माध्यमातून मिळत असल्याचे सांगितले.
प्रकल्पाबाबत मार्गदर्शन -सुनील वानखेडे
प्रास्ताविक राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेचे जिल्हा समन्वयक सुनील वानखेडे यांनी केले. ते म्हणाले की, 10 ते 17 वयोगटातील शाळेतील अथवा शाळाबाह्य कोणत्याही विद्यार्थ्यांना या परीषदेत सहभागी होण्याची संधी मिळते. या कार्यशाळेत प्रकल्प तयार करण्याबाबतचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या सुरुवातीला झूम अॅप वापरण्याबाबत जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सहसचिव संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रकल्प तयार करण्याच्या मुद्देसूद पायर्या या विषयीची सविस्तर माहिती बालविज्ञान परीषदेचे शैक्षणिक समन्वयक बी.बी.जोगी यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील बाल वैज्ञानिक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.बी.जोगी तर आभार संदीप पाटील यांनी मानले.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचे बीजारोपण होणे गरजेचे
संपूर्ण विश्वावर कोरोना विषाणूचे सावट आलेले आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी संशोधनाची गरज आहे. आज विश्वाला संशोधकांची कमतरता जाणवत असून बाल विज्ञान परीरषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये या संशोधनाचे धडे दिले पाहिजे तसेच त्यांच्यामध्ये संशोधनाचे बीजारोपण होणे गरजेचे आहे आणि आता हीच योग्य वेळ आहे या माध्यमातून आपण जगाला भावी शास्त्रज्ञ देऊ शकतो, असे जळगाव जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन, म्हणाले.