पिंपरी-चिंचवड। महापालिकेच्या वतीने भोसरी येथील 12 वर्षीय शालेय विद्यार्थिनी इशिता जाधव हिचा सत्कार करण्यात आला. 8 ते 14 जुलै 2017 दरम्यान जमशेदपूर येथे खेळल्या गेलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत इशिताने 14 वर्ष वयोगटामध्ये प्रथम तर, 16 वर्ष वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. या कामगिरीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाच्या वतीने तिला सन्मानित करण्यात आले. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, हर्षल ढोरे, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, माधुरी कुलकर्णी, कोमल मेवानी, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, नगरसचिव उल्हास जगताप आदी उपस्थित होते.
यापूर्वीही चांगली कामगिरी
2015 मध्ये पुणे जिल्हास्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये तिने द्वितीय क्रमांक पटकाविला होता. तर, 2016 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत इशिताची 14 वर्ष वयोगटात निवड झाली होती. तसेच या वर्षीही तिची एशियन स्पर्धेसाठी निवड झाली होती. सध्या ती महाराष्ट्रात टॉप टेन या रँकमध्ये तर इंडिया टॉप 40 या रँकमध्ये खेळत आहे. चंदीगड येथे होणार्या रोड टू विम्बल्डन राष्ट्रीय सिरीज स्पर्धेत तिची निवड झाली असून, नोव्हेंबर 2017 मध्ये होणार्या आयटीएफ स्पर्धेसाठी ती कसून तयारी करीत आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या ती 14 वर्ष वयोगटात प्रथम रँकमध्ये आहे.