लोंढे वरखेडे प्रकल्प 2019 पर्यंत होणार!

0

मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही
चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी लोंढे वरखेडे प्रकल्प बळीराजा योजनेतून 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून गिरणा नदीवरील बलून बंधाराची कामे दोन वर्षात पूर्ण करणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना व शेतकर्‍यांना विविध योजना, शेतीविषयक संपूर्ण माहिती, लोककल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून देवकर मळा, लक्ष्मी नगर, चाळीसगाव येथे शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान प्रदशर्नाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते.यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी. नाना पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, जि.प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव,उपविभागीय अधिकारी चाळीसगाव शरद पवार, उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा, नारायण देशमुख, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, तहसिलदार, चाळीसगाव कैलास देवरे, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याध्याधिकारी अनिकेत मानोरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष के. बी.साळुंखे, नगराध्यक्षा आशाताई चव्हाण इतर मान्यवर उपस्थित होते.