चाळीसगाव । तालुक्यातील वरखेडे येथील पळसमनी शिवारातील एका शेतकर्याच्या शेतात 10 ते 12 मजूरांसह कपासाच्या शेतात काम करत असतांना 55 वर्षीय महिलेवर मागून येवून अचानक केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाली आहे. या घटनेची माहिती मिळताचा वनविभागातील कर्मचार्यांना घटनास्थळी धाव घेतली आहे. चाळीसगाव तालुक्यातील बिबट्याच्या या हल्ल्यातील हा पाचवा बळी आहे. तर दुसरीकडे 26 रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील लोंढे शिवारातील शेतात बांधलेल्या वासरीपर हल्ला करून तिचा कान तोडला तर गोर्हावर हल्ला करून त्याची मानच तोडल्याने त्याचा जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले असून आतापर्यंत दोन महिला, दोन मुले अशा चार जणांचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी तर अनेक जनावरे मृत्यूमुखी पडले असतांना देखील वनविभागाला हा बिबट्या पकडण्यास अपयश येत असल्याने वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हा निर्माण झाले आहे.
शार्पशुटर व कर्मचार्यांनी रात्री गस्त घाल्याची मागणी
शेतात जाण्यासाठी आता शेतकरी व मजूरांना टोकळ्याचा आधार घ्यावा लागत असून हातात लाठ्या व काठ्या घेऊन दहशतीच्या वातावरणात शेतीची कामे करावी लागत आहे. परीसरात बिबट्याने मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण केली आहे. वनविभागाने मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांची नेमणूक करून शार्प सुटरचीही नेमणूक केली असली तर बिबट्या सापडत नसल्याने नागरीकांच्या भीतीत अधिकच भर पडली आहे. शेतकर्यांना कामे करत यावीत, नागरीकांच्या वतीने शार्प शुटर सह कमचार्यांनी गस्त घालावी यांचेवर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी परीसरात होत आहे.
शेतकर्यांचा वनविभागावर रोष: यावेळी कापूस वेचणी करण्यासाठी एकाच कुटूंबातील सदस्या कापूस वेचत असतांना ही घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होत चाललेल्या बळीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून बिबट्याचे एवढे हल्ले होत असतांना वनविभाग मोठ्या प्रमाणावर सुस्त पडली असल्याची ओरड वजा संताप परीसरातील नागरीक व शेतकर्यांमध्ये होत आहे. नागरीकांच्या म्हणण्यानुसार वरखेडे शिवारातील ही दुसरी घटना असून बिबट्याचा दोन्ही घटनेत सारखाच हल्ला केला आहे. वनअधिकारी येतात आणि पाहणी करून निघून जातात. गेल्या काही महिन्यांपासूनचा हा पाचवा हल्ला आहे. बिबट्या आला आहे अशी माहिती वनविभागाल्या दिल्यानंतर त्यांच्याकडून खरच बिबट्या आला आहे का? नक्की कोठे होता? किती वाजता आला? असे प्रश्न विचारून भेदरलेल्या माणसाला अजून भेदरण्याचे काम वनविभाग करीत असल्याचे शेतकर्यांनी बोलून दाखवले.
माजी आमदारांची भेट
वरखेडे येथील शिवारात महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महीलेचा मृत्यू झाला. वरखेडे शिवरातील त्या घटनास्थळी माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, प्रमोद पाटील आदी पदाधिकारी यांनी भेट देवुन बिबट्याला लवकरच पकडण्याची मागणी केली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यरात्री केला हल्ला; सकाळी 4 वाजता प्रकार उघडकीस
तालुक्यातील लोंढे शिवारात रमेश ज्ञानदेव निकम व दादा विश्वास निकम यांच्या शेतात गाय, वासरे व गोर्हा बांधलेले असतांना काल मध्यरात्री 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यात रमेश ज्ञानदेव निकम यांच्या वासरीवर हल्ला करून त्यात वासरीचा कान तुटला तर जवळच बांधलेल्या गोर्हावर हल्ला चढवत त्याच गोर्ह्याची मानच तोडून टाकली त्याचा काही भाग खावून टाकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास विरेंद्र रमेश निकम हे नेहमीप्रमाणे दुध काढण्यासाठी शेतात गेले असता आवाज ऐकुन बिबट्याने तेथून पलायन केले. सदर नरभक्षक बिबट्याचा परीसरात धुमाकुळ घाला असून त्याच्या दहशतीने नागरीकांना शेतात जाणे व रस्त्यावर चालणे देखील अवघड झाले आहे. त्वरीत वनविभागाने कारवाई करून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे 15 तारखेला महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तरी देखील वनविभाग बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनाची दिशा ठरवणार असून बिबट्याला शुटचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.
– दिनेश पाटील,
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी, चाळीसगाव
वनविभागाने तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात लवकरच त्याला पकडले नाही तर शिवसेना लवकरच वनविभागाच्या अधिका-यांच्या तोंडाला काळे फासुन आंदोलन करणार
– महेंद्र पाटील,
शिवसेना उपजिल्हा समन्वय प्रमुख जळगाव
नेहमीचे बिबट्याचे हल्ले हे चिंतेचा विषय असुन तालुक्यात जवळपास 5 जणांचा मृत्यू झाला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ही वनविभागाचे अधिकारी व वनमंत्री यांची आहे. म्हणुन त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा
– अनिल निकम,
तालुकाध्यक्ष, काँग्रेस, चाळीसगाव