मुंबई : लोअर परळ, ना.म.जोशी श्रमिक जिमखान्याच्या प्रवेशद्वाराशेजारची जुनी हरहरवाला चाळ येथील छोट्याश्या घरात राहणारी सोनाली शिंगटे हीचे जकार्ता येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघात निवड झाली आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी भूषणावह आहे.
सोनालीचे वडील विष्णू सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. आई अपंग. ती खानावळ चालवते. एकूण परिस्थिती बेताचीच. २९ वर्षांपूर्वी ते कोल्हापुरातल्या सावतवाडीहून मुंबईला आले, पोट भरण्यासाठी. त्याकरिता नाना उद्योग केले त्यांनी. चहाचा स्टॉल टाकला. त्यातून भागेना म्हणून सोनालीची आई साखरू यांनी खानावळ सुरू केली; पण त्याही परिस्थितीत त्यांनी सोनालीला शिकवले. विष्णू शिंगटे यांनी सुरुवातीला ज्या लोअर परळ रेल्वे कार्यशाळेबाहेर चहाची टपरी सुरू केली होती, त्याच रेल्वेमध्ये दोन वर्षांपूर्वी सोनालीला नोकरी लागली.