जळगाव | जळगाव जिल्हांतर्गत असलेल्या सर्व तालुक्यातील न्यायालयांसाठी आज जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये ५ हजार २२ खटले निकाली लागले असून ५६ कोटी ४९ लाख ९८ हजार ७६२ रुपयांची तडजोड करण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निदर्शेनानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सत्र न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश जी. ए. सानप उपस्थित होते. तसेच या लोकअदालतीमध्ये जिल्हाभरातील विविध प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली ८४६ तर वादपुर्व प्रकरणांपैकी असलेली ४ हजार १७६ असे एकूण ५ हजार २२ प्रकारणे ५६ कोटी ४९ लाख ९८ हजार ७६२ रुपयांची तडजोड करुन निकाली करण्यात आली. लोकअदालतीचा प्रत्येक गावागावात प्रचार केल्यामुळे आज इतक्या मोठ्या संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी जिल्हा वकील संघाचे आर. आर. महाजन, जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि. जी. मालविय यांच्यासह सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.