लोककलावंताच्या मानधनाचे तीन वर्षांत 180 प्रस्ताव मान्य

0

पुणे । कलाकार मानधन योजनेतून लोककलांवंताना तसेच साहित्यिकांना वृध्दापकाळात शासनातर्फे प्रतिमहीना शासनाच्या वतीने मानधन देण्यात येते. वृध्दापकाळात कलाकारांना सन्मानाने राहता यावे, या हेतुने ही योजना राबविण्यात येते. मागील तीन वर्षांत पुणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील 180 कलावंतांचे या मानधनाचे प्रस्ताव मान्य करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी सांगीतले.

वृद्ध कलाकारांचा सन्मान
मानधन योजनेद्वारे प्रतिमहिना पैसे जमा करून वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांचा मानसन्मान केला जात आहे. मार्च 2014 ते मार्च 2017 या तीन महिन्याच्या कालखंडात जिल्ह्यातील 180 कलावंंतांना मानधन देण्याचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. मान्यवर वृद्ध कलाकारांना मानधन देण्याची योजना 1954-55 पासून राबविण्यात येत आहे. दरम्यान योेेजना सुरू झाल्यानंतर कलाकारांना मानधन देण्यासाठी शासनाच्यावतीने सहा हजारांपासून वाटप करण्यात येत होते. मात्र, वाढती महागाई आणि शासन निर्णयामुळे कलाकारांच्या मानधनात 2014 च्या निकषानुसार वाढीव मानधन देण्यात येत आहे.

प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
राष्ट्रीय कलावंतास प्रतिमहिना 2 हजार 100 रुपये, राज्यस्तरीय कलावंतांना प्रतिमहिना 1 हजार 800 रुपये आणि स्थानिक कलावंतांना प्रतिमहिना 1 हजार 500 रुपयांचे मानधन दिले जात असल्याची माहिती शितोळे यांनी दिली आहे. कलेच्या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे, अशा लोककलावंतांनी मानधन सुरू करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकार्‍यांच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे पाठवावा, असे आवाहन शितोळे यांनी केले.

या आहेत अटी
सांस्कृतिक, कला, वाङ्मय क्षेत्रात कलाकारांनी किमान 15 ते 20 वर्षे महत्वपुर्ण कामगिरी केली आहे. तसेच ज्या स्त्री किंवा पुरुष कलावंताचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना विशेष साहय्य केले जाते. वृद्ध साहित्यिक किंवा कलावंत यांच्या विधवा पत्नींना मानधन दिले जाते. तसेच ज्या कलावंतांना दुर्धर आजार आहे. तसेच ज्यांचे 40 टक्क्यापेक्षा अधिक शारिरीक व्यंग्य आहे, किंवा अपघातामध्ये 40 टक्क्यांपेक्षा अधिक अंपगत्व आले आहे, अशा कलावंतांना मानधन सुरू करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 48 हजारांपेक्षा जास्त असू नये. अर्जदारांनी कागदपत्रांसमवेत कलाकार, साहित्यिक यांचे राजपत्रीत अधिकारी यांनी सांक्षाकीत केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे. तसेच जन्मतारखेचा दाखला, रहिवाशी दाखला जोडणे बंधनकारक आहे. तर कलावंत म्हणून काम करत असताना स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त जोडावे लागणार आहे.

60 कलावंतांची निवड
जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचा सन्मान राखण्यासाठी शासनाच्यावतीने त्यांना मानधन देण्यात येते. त्यासाठी गटविकास अधिकारी यांच्यामार्फेत प्रस्ताव मागविलेे जात आहेत. 2017-18 साठी जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील 60 कलावंतांची निवड केली जाते. कलाकारांनी गटविकास अधिकार्‍यांकडे मानधनासाठी अर्ज करावेत.
-यशवंत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी