लोककला समृद्धीसाठी कलावंतांचा सन्मान व्हावा

0

माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे मत

रेखा काळे, जयमाला इनामदार, देवानंद काळे यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार प्रदान

हडपसर : तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. लावणी मानामध्ये ठसते, तमाशा व लोककलेबद्दल मला ममत्व आहे. महाराष्ट्राची ही लोककला समृद्ध होण्यासाठी कलावंतांचा उचित सन्मान होणे गरजेचा आहे. असे आवाहन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेला होता. पाटील यांच्यासह उल्हास पवार, अभिनेत्री लीला गांधी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी मेघराजराजे भोसले, डॉ मिलिंद भोई, प्रकाश पायगुडे, सुरेश घुले, प्रशांत जगताप, नगरसेविका कालिंदा पुंडे, नगरसेवक मारुती तुपे, विकास रासकर, जयप्रकाश वाघमारे, सत्यजित खांडगे, मित्रावरुण झांबरे, रेश्मा परितेकर, आकाश वाकचौरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबुरे, वसंतराव सोनवणे, श्रीधर जिंतीकर, संतोष जगताप, भरत हगवणे, ज्योतिबा उबाळे, मधुकर गुरव उपस्थित होते.

विविध पुरस्काराने सन्मानित

ज्येष्ठ तमाशा कलावंत रेखा काळे-नेर्लेकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार स्वरूप एकवीस हजार रुपये स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांना व बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार शाहीर देवानंद माळी यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘तम म्हणजे अंधार, आशा म्हणजे प्रकाश या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही लोककला आहे. शेतकरी कामगार, दमल्या-भागल्या जीवांना रिझवणारी ही लोककला आहे. अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

शाहिरी हा महाराष्ट्राचा श्‍वास आहे. एकेकाळी याच शाहिरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले, संयुक्त महाराष्ट्र व अनेक आंदोलनात स्फुल्लिंग चेतविले. अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ शहरी पंथाची सेवा माझ्याकडून घडते, यापेक्षा मोठे भाग्य नाही. पुन्हा जन्म मिळाला तो महाराष्ट्रात मिळावा व पुढचा जन्म शाहिराचाच असावा अशा शब्दांत शाहीर देवानंद माळी यांनी लोककलेबद्दल आदर व्यक्त केला.

पुरस्काराची रक्कम महत्त्वाची नसते

पुरस्काराची रक्कम ही महत्त्वाची नसते ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते महत्त्वाचे असते. लोककलेसाठी ज्यांचे मोठे योगदान आहे असे नामवंत कलावंत, साहित्यिक, अभ्यासक यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे आम्हा कलावंतांचे भाग्याच आहे. अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केल्या. प्रास्ताविक सत्यजित खांडगे यांनी केले. स्वागत जयप्रकाश वाघमारे यांनी केले. आभार रेश्मा परितेकर यांनी मानले. सूत्रसंचालन दीपक वाघमारे यांनी केले.