लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे स्मारक बांधा

0

-बांधकाम कामगार सेनेच्या वतीने मागणी

पिंपरी-चिंचवड : लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बांधकाम कामगार सेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात करून आदरांजली वाहण्यात आली. शहरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक राज्य शासनाने बांधले पाहिजे, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे, उपाध्यक्ष किशोर हातागळे, सरचिटणीस सचिन गुंजाळ, शहराध्यक्ष गंगाधर कांबळे, उज्ज्वला गर्जे, नोसी खान आदी प्रमुखांसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंडे साहेबांची उणीव सदैव भासत राहील
यावेळी बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा लोकनेता आज आपल्यात नाही. त्यांची उणीव सदैव आपल्याला भासत राहील. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी प्रत्येक वर्गावर भरभरून प्रेम केले. बांधकाम कामगार, शेतमजूर व इतर असंघटित क्षेत्रातील कामगार आजही त्यांना दैवत मानतात. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे खूप नुकसान झाले आहे. शहरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी शिंदे यांनी केली.

115 कामगारांना ओळखपत्रांचे वाटप
बांधकाम कामगारांच्या हस्ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकनेते मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 115 बांधकाम कामगारांना शासकीय नोंदणीकृत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच असंघटित कामगारांना बँक खाते उघडण्याच्या मोहिमेतील 85 बांधकाम कामगारांचे खाते उघडून देण्यात आले.