जळगाव: शहरातील प्रभाग 7 मध्ये आमदार राजूमामा भोळे,माजी महापौर सीमा भोळे,माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांचे निवासस्थान आहे. या प्रभागातील काही परिसरात सुविधा आहेत. तर काही परिसरात नागरी सुविधांची वाणवा आहे. एकूणच काय तर ज्यांच्या ताब्यात मनपाची सत्ता आहे. त्यांच्या प्रभागातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. अमृतच्या पाणीपुरवठा योजनेमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदले गेले आहे.त्यामुळे रस्त्यांची पार वाट लागली आहे. साफसफाईची स्थिी तर फार विदारक आहे. अस्वच्छेतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रभाग लोकप्रतिनिधींचा असल्यामुळे किमान मुलभूत उपलब्ध करुन द्यायला हव्यात अशी माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या.
मुलभूत सुविधा नावालाच
प्रभाग 7 हा माजी महापौर सीमाताई भोळे, माजी उपमहापौर आश्विन सोनवणे यांचा प्रभाग आहे. याच प्रभागात शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे निवासस्थान आहे. काही दिवसांपूर्वी आता ते दुसरीकडे राहायला गेले आहेत. या प्रभागात रस्ते, गटारींची दुरवस्था झाली आहे. साफसफाई अभावी गटारी तुंबल्या आहेत. पाणी पुरवठ्याचाही त्रास होता.मात्र भारती सोनवणे या महापौर झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटला. इतर काहीही नको, मात्र किमान मुलभूत सुविधा तरी द्या अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रभागात मुलभूत सुविधा नसतील तर इतर प्रभागांची काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोकळ्या जागांमध्ये झाडेझुडपे वाढले आहेत, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कॉलन्यांमध्ये साफसफाई होत नाही, घंटा गाडी येत नसल्याने उघड्यावर कचरा टाकतात, हा कचराही उचलला जात नसल्याने दुर्गंधी सुटते, गटारींची दुरावस्था झाली आहे, साफसफाई होत नसल्याने गटारी तुंबतात त्यामुळेही साहजिकच डासांची उत्पत्ती होते. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. त्याच बरोबर डांसामुळे साथीचे रोग बळावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अस्वच्छतेचा कळस
प्रभाग क्रमांक 7 मध्ये चंद्रप्रभा कॉलनी, आनंद नगर, विष्णू नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, मणियार लॉ कॉलेज परिसर, बुकब्रॉन्ड कॉलनी, यशवंत कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, शिवकॉलनी, आशाबाबानगर, आरएमएस कॉलनी, शामराव नगर या परिसराचा समावेश आहे. या परिसरात पाहणी करुन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परिसरात नियमित घंटा गाडी येत नाही, आली तर थांबत नाही, ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचलेले असतात, साफसफाई होत नसल्याने अस्वच्छतेचा कळस असल्याचे चित्र दिसून आले. शिवकॉलनीत तर रस्त्यावरच कचर्याचे ढिग दिसून आले.
रस्त्यांची दुरवस्था
प्रभागातील आशाबाबा नगर,आरएमएस कॉलनी,शामराव नगरासह अन्या परिसरातही रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, वाहने चालविणे तर सोडाच मात्र पायी चालणेही अवघड झाले आहे, अमृत योजनेच्या नावाखाली मुख्य रस्तेही खोदून ठेवले आहे. त्या रस्त्यावरुन खडतर प्रवास करावा लागतो. किरकोळ अपघाताच्या नित्याच्याच घटना आहे. रस्ते, गटारी,पथदिवे, स्वच्छता या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवकॉलनी चौकातून शहरात येतांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेवून जावे लागते. यासाठी शिवकॉकनी चौकात बोगदा करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.त्यानुसार प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
’आम्ही सुना बनून आलो होतो, आता सुना आल्या, पण रस्त्याचे भाग्य बदलले नाही
‘आम्ही सुना बनून आलो होतो, आता आमच्या सुना आल्या, पण आमच्या कॉलनीतील रस्त्याचे भाग्य काही बदलले नाही’. अशा शब्दात मंजुषा हौसिंग सोसायटी भागातील महिलांनी उपमहापौर सुनिल खडके यांच्याकडे आपली समस्या मांडली. अनेक ठिकाणी रस्ते झाले पण आमच्याच कॉलनीत रस्ते का होत नाही असा जाबही त्यांनी विचारला . पाणी पुरवठा, स्वच्छता सर्वच विषयांची समस्या आहे. पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने आमच्या गल्लीतील रहीवाशांना आपले नळ आळीपाळीने बंद ठेऊन दाब नियंत्रण करावे लागेत. अशीही माहिती यावेळी देण्यात आली. स्वच्छता तसेच गटारीतील गाळ उपसला जात नसल्याचेही त्यांनी लक्षात आणुन दिले. यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती अॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेविका मंगला चौधरी, मिनाक्षी पाटील, दिपमाला काळे,शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी संजय पाटील, विद्युत विभाग प्रमुख एस एस पाटील, अभियंता योगेश बोरोले, संजय नेवे, अविनाश कोल्हे, मंजुर खान, मोरे, रचना सहाय्यक प्रसाद पुराणिक, सुहास चौधरी, आर.टी.पाटील, आरोग्य अधिक्षक धांडे, निरिक्षक कांबळे, सुरेश भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते.
ट्रफिक गार्डन बनले कचरा आगर
ट्रॅफिक गार्डन कचरा आगर बनले आहे या परिसरात लगतच्या स्लम भागातील लोक कचरा आणुन टाकतात तो कचरा सभोवतालच्या दत्त नगर, बँक कॉलनी इत्यादी कॉलन्यांसह रस्त्यावर देखील उडत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या. या भागात मोठया आकारातील कचरा कुंडी ठेवणे अथवा दोन हौद वजा खंदक खंदणेची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. त्वरीत शक्य ते उपाय योजण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पिंप्राळा गेट जवळ पाणी तुंबल्याच्या ठिकाणांची पाहणी करुन व्हॅक्युम एम्प्टीयर व्दारे पाणी उपसण्याच्या सुचना उपमहापौरांनी दिल्या रहिवाशांनी लोकवर्गणीतून सुशोभित केलेल्या प्रतापनगरातील खुल्या जागेचीही उपमहापौरांनी पाहणी केली रहीवाश्यांच्या मागणीप्रमाणे येथे वडाच्या झाडा भोवती ओटा बांधणे रात्रीची प्रकाश योजना म्हणुन दोन ठिकाणी सोलर लॅम्प बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बागेतील झाडे व रोपटी यांना पाणी देण्यासाठी बोअरवेल घेण्याची नोंद करण्यात आली आहे.या प्रसंगी स्थानिक नगरसेविका अॅड. शुचिता हाडा यांनी पाठपुरावा करुन ओपन जिम चे साहित्य लावले होते त्याचे लोकार्पण मुलभूत सोयी सुविधा या निधी अंतर्गत उपमहापौर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. सुशिल अत्रे, सुनिल कोल्हे, आर्कीटेक्ट ए.आर. चौधरी तसेच महिलामंडळ पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.