नवी दिल्ली : पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. दिल्ली येथे आयोजित एका साहित्य महोत्सवात ते म्हणाले, सध्या काही चित्रपटांवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटांमुळे विशिष्ट धर्माच्या किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जातात, असा आक्षेप घेत त्याविरोधात आंदोलन सुरू आहे.
मात्र, या आंदोलनादरम्यान काही जणांनी मर्यादांचे उल्लंघन करत संबंधित चित्रपटातील कलाकारांवर हल्ला करण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. बक्षीस देण्यासाठी या लोकांकडे खरेच इतका पैसा आहे का? अशा गोष्टींना लोकशाहीत थारा नाही. तुम्हाला लोकशाही मार्गाने विरोध करायचा हक्क आहे, त्यासाठी तुम्ही संबंधित यंत्रणांकडे दाद मागा. परंतु, तुम्ही एखाद्याला शारीरिक इजा पोहोचवणे किंवा हिंसक धमक्या देणे, अशी कृत्ये करता कामा नये. कोणत्याही प्रकारे नियम आणि कायद्यांची पायमल्ली होऊन देऊ नका. मात्र, लोकांच्या भावना दुखावण्याचाही हक्क कोणाला नाही, असे सूचक विधानही नायडू यांनी केले.