नागरिकांनी अनुभवली लावणी
सांगवी : सांगवी परिसरात नुकताच ग्रामदैवत वेताळ महाराज उत्सव साजरा करण्यात आला. विविध धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लावणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टी. व्ही, मोबाईलमध्ये जमान्यात गावच्या ऊरूस यात्रेतुन लोप पावत चाललेली लोककला अनुभवयास मिळाली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची पसंती मिळाली. ‘लोकरंग महाराष्ट्राचे’ हा कार्यक्रम सादर करण्यासाठी नर्तक फिरोज मुजावर व त्यांच्या सहकार्यांना पाचारण करण्यात आले होते.
नागरिकांनी धरला ठेका
विस्मरणात गेलेली गण गवळण, बतावणीची ठसकेदार कॉमेडी, देवीचा जोगवा व वाघ्या मुरळीची पारंपारिक गाणी..सोबत ठसकेबाज लावण्यांनी कार्यक्रमामध्ये बहर आली. सर्वांना या गाण्यांमुळे ठेका धरायला भाग पाडले. तर लावणीने यात्रेच्या शेवटच्या दिवशी उत्सवात रंगत आणली. या रावजी बसा भावजी, प्रितीच झुळ झुळ पाणी, बाई मी लाडाची कैरी पाडाची, येवु कशी कशी मी नांदायला अशा लावण्या फिरोज मुजावर व सहकार्यांनी सादर केल्या. यावेळी त्यांच्याद्वारे अभिनयातून साकारलेले साई लिला दर्शन व स्वामी समर्थ अवतार दर्शन कलाकृतीस सांगवीकरांनी भरभरून दाद दिली. तर पिकल्या पानाचा देठं की हो हिरावा, चोरीचा मामला या मराठी गाण्यांवर तरूणाईस ठेका धरायला भाग पाडले. कार्यक्रमादरम्यान सिने कलावंत फिरोज मुजावर यांचा सांगवीकर व उत्सव समितीच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.