‘लोकराज्य’मासिक म्हणजे महाराष्ट्राचा चालता-बोलता इतिहास

0

धुळे । ‘लोकराज्य’ मासिकाला समृध्द असा इतिहास आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून लोकराज्य मासिकाचे प्रकाशन होत असून लोकराज्यचा प्रत्येक अंक संदर्भग्रंथ म्हणून संग्राह्य आहे. ॠलोकराज्यॠ म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास होय. या मासिकाच्या प्रदर्शनाचा जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा प्रसिध्द गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. ज्येष्ठ कवी, नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होणार्‍या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, धुळे येथे लोकराज्य मासिकाच्या संग्राह्य अंकांचे प्रदर्शन व विक्रीचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले.

मोठ्या संख्येने अधिकार्‍यांची उपस्थित यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर, जिल्हा कोशागार अधिकारी बी. डी. पाटील, अपर तहसीलदार ज्योती देवरे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत उपस्थित होते. संदीप गावित, रावण मोरे, अरुण ओगले, यमुनाबाई सोनवणे यांनी या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्यास एसएसव्हीपीएस पत्रकारिता महाविद्यालय, कानुश्री पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्रा. जसपालसिंह सिसोदिया, पत्रकार अरुण पाटील, रामचंद्र दंडवते, प्रवीण देशमुख, प्रशांत परदेशी आदि उपस्थित होते.

मासिकामुळे ज्ञानात नवनवीन माहितीची भर
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, लोकराज्य मासिकामुळे ज्ञानात नवनवीन माहितीची भर पडते. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमधील प्रगतीचा आढावा लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून घेतला जातो. जिल्हा माहिती कार्यालयाने घेतलेल्या या कल्पक, कौतुकास्पद उपक्रमातून मराठी भाषा लोकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. मराठी भाषेत परकीय भाषेतील शब्दही आहेत. त्यामुळे मराठी भाषा समृध्दच होत आहे. मराठी भाषा लोकापर्यंत पोहोचविण्यात कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे.

लोकराज्य मासिक संग्राह्य
तहसीलदार देवरे म्हणाल्या, मराठी भाषा गौरव दिन व लोकराज्य मासिकाच्या अंकांचे प्रदर्शन हा दुग्धशर्करा योग आहे. स्पर्धा परीक्षा देताना लोकराज्यचे जुने व संदर्भमूल्य असलेल्या अंकांचा शोध आम्हाला घ्यावा लागत असे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांनी लोकराज्य अंकांचे प्रदर्शन भरवून स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा माहिती अधिकारी राजपूत यांनी सांगितले, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकराज्य मासिकाच्या संग्राह्य व संदर्भ मूल्य असलेल्या अंकांचे प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने राबविला आहे. या प्रदर्शनाचा स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.