मुंबई । रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम करणार्या गँगमनच्या पथकातील तीन महिला कर्मचार्यांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील मालाड स्टेशनजवळ घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमीही झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. बोरीवलीहून चर्चगेटला जाणारी लोकल मालाडजवळ पोहोचली, तेव्हा काही महिला ट्रॅकवर काम करत होत्या. त्यांनी ट्रेन येत असल्याचं पाहिलंही, पण त्याचवेळी इतर दोन ट्रॅकवरूनही लोकल आल्या आणि त्या गोंधळल्या. कोणती लोकल कुठल्या ट्रॅकवर येईल, याचा अंदाज त्यांना आला नाही आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.
या धडकेत अनिता भय्यालाल शिंदे (32), जया राजू खटावसे (35), शिवानी गजानन भोर्यालय (18) या तीन महिला जागीच ठार झाल्या तर सुनिता गजानन भोर्यालय ही महिला गंभीर जखमी असून सहकारी शताब्दी हॉस्पिटलमध्ये ती मृत्यूशी झुंज देत आहे.