लोकलच्या फेर्‍या वाढत नसल्याने प्रवाशांची ओरड

0

लोणावळा : पुणे-लोणावळा या मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील लोकलच्या फेर्‍या वाढत नसल्याने प्रवाशांनी याबाबत ओरड सुरु केली आहे. 11 मार्च 1978 साली पुणे-लोणावळा लोकल सुरु झाली. मात्र या 42 वर्षात केवळ 44 फेर्‍या असल्याने मात्र या मार्गावरील तिसरी रेल्वे लाईन काही सुरु झालेली नाही. अद्याप कोणतीही वाढीव फेरी वाढवण्यास रेल्वे प्रशासनाकडून तयार दिसून येत नाही.

दररोज 44 फेर्‍या…

पुणे- लोणावळा मार्गावर उपनगरीय लोकल गाडयांच्या दररोज सुमारे 44 फेर्‍या होतात. सुमारे 120 एक्सप्रेस गाड्या आणि 25 ते 30 मालगाड्या या मार्गावरून दररोज जातात. त्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. लोहमार्गाच्या देखभालीचा दिवसातील काही वेळ वगळता इतर वेळेला अगदी मध्यरात्र ते पहाटेपर्यंतही हा मार्ग व्यस्त असतो. पुणे- लोणावळा मार्गावरील लोकल गाड्यांची मागणी वाढते आहे. पुणे- मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी गाड्या देण्याचीही मागणी कायमची आहे. मात्र, मार्गाची सद्य:स्थिती पाहता एकही नवी गाडी सुरू होऊ शकणार नसल्याचे चित्र आहे.