जळगाव । भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. पण अलीकडच्या काळात मतदानाचा टक्का सतत घसरत चाललाय. सर्वच स्तरांतून त्याबाबत तीव्र चिेंता व्यक्त होत असताना येथील मू.जे. महाविद्यालयात मतदार जागृती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या मतदान जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मतदान करण्यासंदर्भात जनजागृती घडून यावी या उद्देशाने मू.जे. महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यासोबतच महाविद्यालय परिसरात मतदान जनजागृतीपर पोस्टर्स देखील लावण्यात आलेले आहेत. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या पथनाट्य सादर करून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
मतदानाचा टक्का वाढावाः लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी मतदान करणे अधिक गरजेचे आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे हा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. प्रत्येक पात्र मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याबाबत संदेश यावेळी पथनाट्याद्वारा देण्यात आला. मतदान करणे का आवश्यक आहे हे पथनाट्याद्वारे पटवून देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
विद्यार्थी पथनाट्य सादर करीत असतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.एन.व्ही. भारंबे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.एल.पी.वाघ यांनी केले. यावेळी डॉ.चंद्रमणी लभाणे, प्रा. योगेश महाले इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी काही पोस्टर्स महाविद्यालय परिसरात लावण्यात आलेले आहेत.
घोषवाक्य असलेले फलक
पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व सांगतांना आपले मत आपली ताकद, आपले मत बदल घडवू शकते अशा स्वरूपाचे संदेश देण्यात आले. सक्षम मतदार सक्षम भारत घडवू शकतात याची जाणीव यावेळी करून देण्यात आली. एक ओट से होती जीत हार, वोट न कोई हो बेकार अशी घोषवाक्य असलेले फलक यावेळी विद्यार्थ्यांनी पकडली होती. पथनाट्य पाहण्यास विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.