लोकशाही दिनाला अधिकारी उपस्थित नसल्याने निषेध

0

नवापूर। नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नवापूर तहसील कार्यालयात गुरुवारी 22 रोजी तहसीलदार्‍याच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. मात्रा काही अधिकारी सतत गैरहजर असतात त्यामुळे समस्या कोणापुढे मांडायचे? असा प्रश्‍न करत अधिकार्‍यांचा निषेध करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी खुर्चीवर बसता जमिनीवर बसून गांधीगीरी मार्गाने निषेध नोंदविला. नायब तहसीलदार एस बी पावरा यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पावरा यांनी येवले यांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. राज्यपाल यांच्या आदेशान्वये लोकशाही दिनाला तालुका स्तरावरील सर्वच कार्यालयीन अधिकारी यांनी उपस्थित असणे बंधनकारक आहे.गेल्या अनेक महिन्या पासुन तक्रारीचे निवारण झालेले नसून संबंधित विभागातर्फे मनमानी कारभार सुरु आहे.

उद्देशाला फासला हरताळ
संबंधित तक्रारी बाबत ठेकेदाकडून दंडाची वसुली करण्यात आलेली नसून अधिकारी व ठेकेदारांचा संगनमताने भष्ट्राचार केल्याचा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी, नगर पालिका, तालुका भुमिलेख कार्यालयाचा विभाग प्रमुख ऐवजी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते तर वन विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, तर पोलीस ठाणे या विभागातील अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे लोकशाही दिन घेण्याचा उद्देशाला हरताळ फासत असल्याचे दिसत आहे.

समस्या ‘जैसे थे’
नवापूर या आदिवासी भागात अनेक प्रश्न, समस्या आहेत त्या जलद गतीने सुटु शकतात त्यामुळे अनेक जण लोकशाही दिनात तक्रारी करतात परंतु अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने समस्या ‘जैसे थे’आहेत शासनाच्या या चांगल्या उपक्रमाला अधिकारीच गैरहजर राहुन एक प्रकारे या दिनाचा थट्टाच होत असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.