खोट्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल; शहराच्या पर्यावरणाची दुर्दशा चुकीच्या धोरणांमुळे
महापौरांना दिले निवेदन
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील विकास व पर्यावरण ह्या मध्ये काहीतरी मोठी गडबड सुरु आहे. आपण आपल्या शहरातील सर्व नद्या प्रदुषित करीत आहोत. आपल्या शहरात अनावश्यक बाबीवर आपण जास्त लक्ष केंद्रित करीत आहोत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आपण सोयीस्कर रीत्या पांघरूण घालुन प्रलंबित ठेवत आहोत. शहरातील अनेक गटारे थेट नदी पात्रात मैला पाणी सोडले जात आहेत, तेही शुद्धीकरण प्रकिया न करता. तसेच जलपर्णीसारखा गंभीर विषय फक्त बोलण्या पुरताच उरला आहे, अशा अनेक विषयांकडे डोळेझाक केली जात आहे, तरी या गोष्टींचा, इसिएतर्फे पर्यावरणासाठी केल्या जाणार्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशा मागणीचे निवेदन महापौर नितीन काळजे यांना देण्यात आल्याचे विकास पाटील यांनी सांगितले.
बीआरटी तातडीने सुरु करावी
पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी सेवेसारखा अति उपयुक्त उपक्रम 99% पूर्णत्वाला आला असताना आपण त्याकडे अचानक दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रश्नावरून महापलिकेत राजकीय सत्तांतर होऊ शकण्याची शक्यता बळावली आहे. बीआरटी सेवा तातडीने सुरु करावी व शहरच्या सार्वजनिक वाहतुकीची समस्या मार्गी लावावी. मेट्रोची पुढील पाच वर्षात कोणतीही गरज नसताना त्यामागे लगेच लागून व पिंपरी पासून निगडी पर्यंत नेण्याचे नाटक करणे काहीही गरजेचे नव्हते. मेट्रोची गरज 2025 मध्ये असेल. पुणे ते देहूरोड पर्यंत मेट्रो असणे गरजेचे आहे. शहराचे आरोग्य एवढे ढासळले आहे की, सर्वात जास्त डॉक्टर व औषधाची दुकानांची गर्दी झाली आहे. शहरातील सर्व रस्त्यांवर रात्री 7 नंतर खुले आम दारू पिणारे थैमान घालत आहेत.
पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही
पाणी पुरवठ्यात राजकारण व भ्रष्टाचार चालू आहे. आवश्यक सेवा विभागात अधिकारी कित्येक वर्षांपासून आर्थिक लाभापोटी ठाण मांडून आहेत. शहराचे विद्रुपीकरण करणारे मुजोर झाले आहेत. त्यांना कोणाचीही भीती वाटत नाही. वृक्षगणना विषयाला हस्यास्पद बनवून ठेवले आहे. प्रगती काय आहे ह्याकडे कोणाचेच लक्ष नाही. मनपा शिक्षण विभागाची अधोगती होत चाललेली आहे. पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी नसणे ही शरमेची बाब आहे. शहरातील रेल्वे स्टेशन वरून बस सेवा उपलब्ध नसणे. प्रवाश्यांची होत असलेली हालअपेष्टा पहावत नाही. रिक्षाचालकांबाबत अनास्था व गैरसोयी आहेत. खाजगी प्रवासी वाहतूक धोरण बनणे आवश्यक आहे. वाहतूक नियंत्रण म्हणजे फक्त पोलीस विभागाची आर्थिक कमाई व वार्डनच्या पगाराची बिले निर्माण करणे असे समीकरण झाले आहे.
कचरा संकलन कोलमडले
महापालिकेच्या शहरातील कामकाजात अनुभवी नागरीकांचा समावेश न करण्यामागे राजकीय डावपेच स्पष्ट दिसून येत आहेत. प्रशासन / लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा नागरिकांशी संपर्क तुटत चालला आहे. अंदाज पत्रकीय वार्षिक आर्थिक तरतुदी करताना गरजा व आवश्यकता तपासणे गरजेचे आहे. राजकीय डावपेच करून शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न गरजेनुसार चिघळविण्यात जास्त रस राजकीय सत्ताधारी मंडळीस दिसत आहे. आपल्या शहरातील कचरा व्यवस्थापन व संकलन व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे. त्याकडे तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या घरचा कचरा रोज नित्याने उचलला जावा म्हणून घंटा गाड्या त्वरित उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. कायद्या नुसार मनपा आरोग्य विभाग हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी याच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. आरोग्य कार्यकारी अधिकारी हा आरोग्य विषय निगडीत सॅनिटरी इन्स्पेक्टर तोडीचा असणे गरजेचे आहे. त्या योग्यतेचे अधिकारी आपल्या महापालिकेच्या सेवेत आहेत त्याना ती जवाबदारी सोपवावी.