राजकारण फार चमत्कारिक असते. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांना पराभूत करण्यासाठी खेळल्या गेलेल्या खेळ्यांनी ते अधोरेखित झाले. मुळात भारतीय लोकशाही आता अशा वळणावर आली आहे, की या देशात कोणत्याहीक्षणी तिचा अस्त होऊ शकतो, की काय असे वाटावे. स्वातंत्र्यपूर्व सत्ताहिनता आणि स्वातंत्र्योत्तर कालावधीत सातत्याने सत्ताधारी असा प्रवास ज्या काँग्रेस पक्षाने केला, त्या काँग्रेसचे आजचे पानिपत या पक्षाची भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असेल, हे स्पष्ट करते. भारताच्या जडणघडणीत अगदी सिंहाचा वाटा असलेला हा पक्ष आज शक्तिहीन झाला आहे. त्याला पक्षाच्या नेतृत्वाची धोरणे कारणीभूत आहे. देशाच्या ध्येय-धोरणे, विकासात्मक वाटचाल आणि दीर्घकालिन नियोजन या सर्वच बाबतीत काँग्रेसने दीपस्तंभासारखे काम केले. काँग्रेस पक्षाला आजवर जे नेतृत्व मिळाले, ते परिपक्व, प्रगल्भ आणि देशाच्या विकासात्मक वाटचालीविषयी कमालीचे संवेदनशील असे लाभलेले आहे. तरीही मोदीयुगाच्या या कालखंडात काँग्रेसचा शक्तिपात का व्हावा? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यसभेच्या इतर जागांच्या निवडणुकीत जेवढी चर्चा झाली नाही; तेवढी अहमद पटेल यांच्या गुजरातमधील जागेच्या निमित्ताने झाली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी पक्षाचा देशपातळीवर कारभार पाहिला. कुणाचे सरकार पाडावे, कुणाचे सरकार आणावे? इतपासून ते कोण्या राज्याचा मुख्यमंत्री कोण करावा? याचे नियोजन, राजकीय षडयंत्र वैगरे वैगरे हेच पटेल रचत होते, पाहात होते. एकंदरित, ते काँग्रेसचे चाणक्य होते. आजच्या राजकीय परिस्थितीला पटेल यांचेच नियोजन कारणीभूत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय वाताहतीलाही तेच अगदी ठळकपणे जबाबदार ठरतात.
गुजरातमध्ये त्यांच्याच नेतृत्वात पुढे आलेल्या बलवंतसिंह राजपूत या काँग्रेस बंडखोराने पटेल यांच्या नाकात दम आणला. राजपूत मैदानात नसते तर पटेल सहज विजयी झाले असते. परंतु, पटेल जसे काँग्रेसचे चाणक्य आहेत; तसेच भाजपकडेही अमित शहा यांचासारखा चाणक्य आहे. या दोघांत उडदामाजी काळे-गोरे ठरविता येणार नाही. शहा यांनी पटेल यांचा काटा काढण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून आगामी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे मनोध्यैर्य खच्चीकरण करण्यात बाजी मारली आहे. बलवंतसिंह राजपूत हे कोण आहेत? तर गुजरातमधील एक छोटा किराणा दुकानदार. या माणसाला पटेल यांनीच राजकारणात मोठे केले. तेल विकून पोट भरणारा हा नेता आज 323 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. ज्या पटेल यांनी त्याला मोठे केले, त्याच पटेल यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावण्याचे काम राजपूत यांनी केले. म्हणूनच, राजकारण हे अनिश्चिततेचा खेळ असून, त्यात तुमचा कधी ‘गेम’ होईल हे सांगता येत नाही. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अगदी उघड उघड क्रॉस वोटिंग झाले. पक्षाच्या आमदारांना लागलेली गळती थांबविण्यासाठी 44 आमदारांना बेंगळुरूच्या एका आलिशान रेसॉर्टमध्ये ठेवून आणि त्यांची सर्वप्रकारे शाही बडदास्त ठेवूनही क्रॉस वोटिंग होत असेल तर काँग्रेसने आता खरोखर आत्मचिंतन करावे. एक-दोन नव्हे तर आठ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती पक्षप्रभारी अशोक गहलोत यांनीच प्रसारमाध्यमांना दिली होती. याचा अर्थ आता अहमद पटेल यांच्यासारख्या पक्षातील अत्यंत ताकदवान नेतृत्वाची पक्षावरील पकड ढिली असून, हे काही पक्षासाठी सुचिन्हे नाहीत. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावरच जर वरिष्ठांची पकड नसेल, तर पक्षाची होणारी वाताहत कुणीही रोखू शकणार नाही. मुळात पटेल आणि अमित शहा हे दोघेही गुजरातचेच. खरे तर हा जय-पराजय हा लोकशाहीचाच पराभव ठरणारा आहे. कारण, ज्या पद्धतीने ही निवडणूक आणि मतदान झाले ती पद्धत सदृढ लोकशाहीसाठी अपेक्षित नाही. हा एकूणच प्रकार धोक्याची घंटा आहे.
गुजरातमध्ये पटेल आणि शहा यांनी जो मतांचा घोडेबाजार केला, तो अत्यंत निंदनीय, धक्कादायक आणि लोकशाहीच्या कोणत्याच तत्वात बसणारा नाही. मुळात पटेल यांची जागा तात्विकदृष्ट्या भाजपची नाही. काँग्रेसने आपलीच जागा लढविली तर भाजपने लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवले. तीन जागांसाठी अमित शहा, स्मृती इराणी आणि अहमद पटेल रिंगणात होते. शहा आणि इराणी यांच्याविरोधात काँग्रेसने काहीही कुभांड रचले नव्हते. परंतु, शहा यांनी मात्र पटेल यांच्या पराभवासाठी साम-दाम-दंड-भेद आदी सर्व प्रकारची नीती वापरली. पटेल यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात अशाप्रकारची निवडणूक पाहिली नसेल. अनेकांची राजकीय कारकीर्द त्यांनी घडविली आहे; तद्वतच बिघडवलीही आहे. परंतु, स्वतःच्या कारकिर्दीसाठी इतका टोकाचा राजकीय संघर्ष करावा लागेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. सोनियांचे विश्वासू साथीदार, काँग्रेसचे चाणक्य, भारतीय राजकारणातील अत्यंत वजनदार नेते अशा नानाविध बिरुदांनी ज्या नेत्याला आपलेसे केले. त्याच नेत्याला त्याच्याच चाणक्यनीतीपूर्ण व्यवहाराने अमित शहा यांनी धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. एकूणच जे घडले ते संपूर्ण काँग्रेसच्या नैतिक अधःपतनाचे फलित आहे. कारण पटेल हेच काँग्रेस चालवत होते. भाजप किंवा काँग्रेस या दोघांपैकी कुणाचाही विजय झाला असला तरी, तो लोकशाहीचा झालेला घात आहे. तो लोकशाहीचाच पराभव आहे. लोकशाहीला पराभूत केल्याबद्दल आम्ही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करतो. आपल्याच कर्तृत्वाची फळे भोगणार्या अहमद पटेल यांचेही आम्ही सांत्वन करतो, आणि काँग्रेस पक्षाला आता तरी सुबुद्धी येवो, अशी कामना करतो. लोकशाही शेवटची घटका मोजत आहे, तिला जीवंत ठेवण्यासाठी काँग्रेसने आता तरी हालचाल करावी. अन्यथा गळितगात्र झालेल्या काँग्रेसच्या नरड्यावर पाय ठेवून या देशात कधी हुकुमशाही अवतरेल ते सांगता येणार नाही!