मेरठ : नेहमी वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून देणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात केली आहे. आगामी उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेरठमधील एका जाहीर सभेत बोलताना साक्षी महाराजांनी देशातील लोकसंख्यावाढीचा मुद्दा उपस्थित केला. लोकसंख्यावाढीला एक विशिष्ट धर्मच जबाबदार आहे, असे वक्तव्य करून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुस्लिम समाजावर आरोप केला. वाढत्या लोकसंख्येमुळे देशात अनेक समस्या उद्भवल्या आहेत. मात्र त्या समस्यांना हिंदू जबाबदार नाहीत. चार पत्नी आणि 40 मुले असलेले त्यास जबाबदार आहेत, असे विधान साक्षी महाराजांनी केले. त्यांच्या या विधानावरून सर्वपक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
म्हणे, मी कुण्या धर्माविरुद्ध बोललो नाही!
या सभेत बोलताना साक्षी महाराज म्हणाले, हिंदू माता असो वा मुस्लिम माता, सर्वांनीच त्यांचा सन्मान द्यायला हवा. चार विवाह आणि ‘तीन तलाक’ प्रथेवर त्यांनी सडेतोड मते मांडली. ते म्हणाले, ‘तीन तलाक’ या प्रथा आता नष्ट करून सर्वांसाठी समान कायदा बनवण्याची वेळ आली आहे. यावेळी साक्षी महाराजांनी राम मंदिराचा मुद्दा हा भाजपचा नव्हे तर साधू-संतांचा असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करत आपण कोणत्याही एका विशिष्ट समाजाविषयी बोललो नाही, अशी प्रतिक्रिया ‘सीएनएन न्यूज 18’ प्रतिनिधीकडे बोलताना व्यक्त केली. मी कोणत्याही समाजाविषयी बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मात्र जे काही असेल तर निवडणूक आयोगाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेससह सपा, बसपाचीही साक्षी महाराजांवर टीका
साक्षी महाराज यांच्या वक्तव्यावर उत्तर प्रदेश काँग्रेसने जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपनेते धर्मविरोधी विधाने करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते अखिलेश सिंह यांनी केली आहे. साक्षी महाराज यांना भाजपने निलंबित करावे आणि संसद सदस्यत्त्वही रद्द करावे, अशी मागणीही सिंह यांनी केली. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही साक्षी महाराजांच्या वक्तव्यांवर टीका केली. भाजपच्या नेते नेहमीच चिथावणीखोर भाषणे करतात, असे सपाने म्हटले आहे. साक्षी महाराज यांनी यापूर्वीही अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे हिंदू नसून, राजकारणातील पप्पू असल्याची टीका साक्षी महाराजांनी केली होती.