लोकसंख्या मर्यादीत ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन करा

0

सासवड । जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने 27 जून ते 10 जुलै या काळात दाम्पत्य संपर्क पंधरवडा साजरा करण्यात आला. आता 11 ते 24 जुलै या काळात लोकसंख्या स्थिरता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ती मर्यादित राहावी आणि कुटुंब नियोजन व्हावे. यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून जनतेमध्ये प्रबोधन केले जात आहे. त्यामुळे कुटुंब सुखी आणि मर्यादित ठेवण्यासाठी जोडप्यांनी कुटुंब नियोजन साधनांचा अवलंब करावा. त्यातून देशाच्या व कुटुंबाच्या प्रगतीमध्ये सामील व्हावे, असे आवाहन पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उदय तिडके आणि सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव शिंदे यांनी केले आहे.

शासनाची विशेष मोहिम
जनतेमध्ये विशेषतः नवविवाहित जोडप्यांनी कुटुंब नियोजन करणे, दोन अपत्यांमधील योग्य अंतर राखणे यासाठी कुटुंब नियोजन साधनांचा अवलंब करण्यासाठी जनजागृती, प्रचार आणि प्रसार करणे यासाठी शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने या मोहिमेत विविध शिबिरे घेण्यात येणार आहेत.

कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती
या अभियानामध्ये जिल्हा रुग्णालय, तालुक्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, मदतनीस, कर्मचारी यांनी गावागावात जाऊन 15 ते 49 या वयोगटातील महिला आणि पुरुष यांना कुटुंब नियोजनाची माहिती देऊन त्याबाबत शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन केले. तसेच 11 ते 24 जुलै या काळात लोकसंख्या स्थिरता पंधरवड्यात दोन मुलांतील अंतर राखण्यासाठी वापरण्यात येणार्‍या साधनांची माहिती देण्यात येत असल्याची माहिती डॉ. तिडके यांनी दिली.

दोन मुलांमध्ये अंतर ठेवा
दोन मुलांमधील अंतर राखण्यासाठी प्रसूतीनंतर 48 तासांच्या अगोदर तांबी बसवावी. तसेच कॉपरटीचा वापर करावा. जेणेकरून त्याचा लोकसंख्या रोखण्यासाठी चांगला उपयोग होईल. विशेष म्हणजे एकदा ही कॉपरटी बसविल्यानंतर ती किमान 5 वर्षे सुस्थितीत राहते. तसेच त्याचे इतर कोणतेही दुष्पपरिणाम होत नसून अपत्यांमधील अंतर राखण्यासाठी खूप लाभदायक आहे, असे डॉ. नामदेव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

35 टक्के महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया
यावर्षी सासवडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये एकूण 209 महिलांची प्रसूती झाली असून त्यापैकी 58 प्रसूत महिलांना तांबी बसविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षात 1,045 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून केवळ तीन महिन्यात 373 म्हणजे सुमारे 35 टक्के महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात 90 तर आरोग्य उपकेंद्रांमध्ये 373 अशा एकूण 463 शस्त्रक्रिया केल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात 196 तर आरोग्य उपकेंद्रामध्ये 10 अशा एकूण 206 महिलांना तांबी बसविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 78 महिलांना कॉपरटी बसविण्यात आली आहे.

पुरुष नसबंदीसाठी अनुदान
लोकसंख्या वाढ रोखणे हे केवळ एकट्या महिलांचे कार्य नसून त्यामध्ये पुरुषांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे पुरुषांनी नसबंदी करून घ्यावी.पुरुष नसबंदीमध्ये नंदुरबार, गडचिरोली या आदिवासी भागातील पुरुषांची आघाडी असून सुशिक्षित आणि सुसंस्कृत भाग मात्र, अद्यापही यामध्ये पाठीमागे आहे. यासाठी शासन अनुदान सुद्धा देत आहे. महिला शस्त्रक्रियासाठी एपीएलसाठी 250 तर बीपीएलसाठी 600 इतके अनुदान देण्यात येत आहे. पुरुष नसबंदीसाठी 1100 आणि केंद्राच्या माध्यमातून आणखी 350 असे 1,450 रुपये देण्यात येतात. शिवाय ही शस्त्रक्रिया बिनटाक्यांची असून याचा कोणताही त्रास पुरुषावर होत नाही. त्यामुळे पुरुषांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ शिंदे यांनी केले आहे.