पूना सिटिझन-डॉक्टर्स फोरमतर्फे यंदाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. वाटवानी यांचा सत्कार
पुणे : देशातील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोक साधारणपणे स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये महिला आणि पुरुषांचे प्रमाण सारखेच आहे. पण महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त प्रमाणात घराबाहेर पडत असल्यामुळे विपन्नावस्थेत रस्त्यावर फिरणारे पुरुष जास्त आढळून येतात. तर महिला मात्र घरात असल्यामुळे त्यांच्या आजाराविषयी फार वाच्यता होत नाही. समाजाच्या विविध घटकांसाठी झोकून देऊन काम करणारे आमटे कुटुंबीय हीच माझ्या कार्याची प्रेरणा आहे, असे मत रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित मनोविकार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केले. पीसीडीएफ अर्थात ‘पूना सिटिझन-डॉक्टर्स फोरम’तर्फे यंदाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. वाटवानी यांचा सत्कार आणि विशेष मुलाखत आयोजित केली होती. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते डॉ. वाटवानी यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी लेखक, समाजसेवक डॉ. अरुण गद्रे होते. यावेळी डॉ. भरत वाटवानी यांच्याशी डॉ. शारदा बापट आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी संवाद साधला.
वंचित घटक कार्यासाठी खुणावतात
डॉ. वाटवानी म्हणाले, समाजासाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही नेहमीच असमाधानी असते. कारण एकानंतर एक असे अनेक वंचित घटक त्याला त्याच्या पुढील कार्यासाठी खुणावत असतात. आयुष्याच्या एका वळणावर खूप निराश झाल्यानंतर काही प्रेरणा केंद्रांना मी भेटी दिल्या. त्यांपैकी एक प्रेरणा केंद्र होते बाबा आमटेंचे आनंदवन. तिथे राहून आल्यानंतर मनातील सगळी जाळी-जळमटी बाजूला केली आणि कामाला लागलो ते पुन्हा न थांबण्याच्या इराद्यानेच!
करुणा हाच समान धागा
डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, करुणा हा समाजसेवकाच्या मनाचा स्थायीभाव असतो. तीच त्याच्या कार्याची प्रेरणा असते. बाबांच्या मनात हीच प्रेरणा जागृत झाल्याने आनंदवन आणि हेमलकसा यांसारखे प्रकल्प उभे राहिले. करुणा हाच दोन समाजसेवकांमधील समान धागा असतो. वाटवानींसारख्या भारावलेल्या तरुणांमुळे बाबा खूप प्रभावित व्हायचे आणि त्यांच्यात ते समाज कार्याचे बीज रोवायचे.
समाज मनोरुग्णांना स्वीकारत नाही
मी या आजाराविषयीचे सेवा केंद्र दहिसर येथे सुरू केले, त्यावेळी त्या परिसरातील लोकांनी खूप विरोध केला. आजही मानसिक व्याधींचा स्वीकार आपल्याकडे खुलेपणाने केला जात नाही, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. समाज मनोरुग्णांना स्वीकारायला तयार नसल्याने त्यांच्यावरील उपचार, त्यांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते. यातून समस्या जटिल होतात आणि त्यातून असंख्य लोक कुटुंबाच्या मायेला पारखी होतात, अशी खंत डॉ. वाटवानी यांनी व्यक्त केली.