वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलकांचा प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या
भुसावळ- वनहक्क कायद्याची अंमजबजावणी करावी व अन्य मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाचेवतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी भजन सत्याग्रह मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर काही वेळ ठिय्या मांडत प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. वनहक्क दावे सहा महिन्याच्या आत निकाली काढण्यात येतील असे आश्वासन यापूर्वी प्रशासनाने दिले होते मात्र त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्यामुळे पुन्हा मोर्चा काढण्यात आल्याचे लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या.
प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने मोर्चा
वनदाव्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यात सकारात्मक निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते शिवाय या बाबीला सहा महिने उलटल्यानंतरही न्याय मिळालेला नाही. संसदेत याबाबत विधेयक मंजूर झाले असतांनादेखील येथील भुसावळ प्रांताधिकारी यांच्याकडे बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ येथील वनदाव्यांची संख्या अद्याप निश्चित केली नसल्याने मोर्चेकर्यांनी ज्ञानोबा , तुकाराम, मुक्ताई-जनाई, वनपट्टे आम्हाला देगा आई म्हणत भजन सत्याग्रह आंदोलन केले. यानंतर प्रांतासोबत साडेतीन तास चर्चा करण्यात आली.
तफावत मिटवणार : 14 रोजी बैठक
मुक्ताईनगर तसेच बोदवड व भुसावळातील वनदाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 14 रोजी प्रांतांनी बैठक बोलावली असून त्यात लोकसंघर्षचे चंद्रकांत चौधरीदेखील उपस्थित राहणार आहेत तसेच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अध्यक्ष आदींनाही उपस्थित राहण्याचे बजावण्यात येईल, असे प्रांतांनी आश्वासन दिले. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर 18 सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे ठरले.
अशा आहेत मोर्चेकर्यांच्या मागण्या
दीपनगर व हायवेमुळे बाधीत झालेल्या गावांतील शेतकर्यांना न्याय देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, दीनदयाल नगरामध्ये हायवेमुळेचौपदरीकरण करण्यात येणार्या घरांचे पुनर्वसनासाठी कस्तूरबा गांधीनगरातील कामाला गती देण्यात यावी आदी मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या.
यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी, केशव वाघ, हिलाल ठाकुर, माणिक पाटील, रशिद तडवी, निर्मला ठाकुर, विमल पाटील, वामन भिल, बाळू इंगळे, अशोक तायडे, सतीश पाटील, बुमीबाई पावरा, कल्पना बेलदार आदिंचा समावेश होता.