खा. काकडे व छगन भुजबळ यांचीही भेट
पुणे : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी प्रदेश समितीने मोहन जोशी, अभय छाजेड आणि अरविंद शिंदे अशी तीन नावे केंद्रीय समितीला पाठविण्याचे ठरले आहे, असे समजते. त्याचवेळी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले खासदार संजय काकडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची पुण्यात भेट झाली; ओबीसींचा पाठिंबा राहील असे आश्वासन भुजबळ यांनी काकडे यांना दिले.
भाजपचा संभाव्य उमेदवार कोण?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निवड समितीची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. त्यात पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी पाच इच्छुकांपैकी तीन नावे निश्चित केली, अशी चर्चा काँग्रेस गोटात सुरू आहे. ही तीन नावे केंद्रीय समितीकडे जातील त्या पातळीवर उमेदवार ठरेल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा निर्णय अंतिम राहील असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीला चालना दिली आहे. त्याच वेळी भाजपचा संभाव्य उमेदवार कोण असेल? याचाही अंदाज घेतला जात आहे. याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मतही अजमावले जाईल. पुण्याच्या जागेवरील दावा राष्ट्रवादीने अजूनही कायम ठेवला आहे.