मुंबई – राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत रामविलास पासवान यांनी २०१९ साली मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढविण्याचे आपल्या मनाविरूद्ध जाहीर केले. शिवसेनेला हे कदापीही मान्य होणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकांना अजून दोन वर्षे आहेत. मग, आपले नेतृत्त्व थोपवण्याची इतकी घाई का, ्सा सवालही त्यांनी रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला. केंद्रात तुमची सत्ता आहे. महाराष्ट्रात मात्र, युतीची सत्ता आहे. आमचा भक्कम पाठिंबा असताना तुम्ही मध्यावधी निवडणुकांची भाषा करता. कधीही मध्यावधी निवडणुका घ्या. आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले.
निवडणुकीआधी चाय पे चर्चा. आता गाय पे चर्चा. गाय वाचवा. पण, आधी देश वाचवा. देश वाचला तर गायही वाचेल आणि आपण सर्व वाचू. उत्तर प्रदेशात योगी तर येथे निरूपयोगी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही कायमचा पाठिंबा देऊ केला. पण, या सरकारने त्यावर काहीही केले नाही. काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये आणि यांच्यात काय फरक आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला.