नवी दिल्ली- २०१९ पर्यंत लोकसभा निवडणूका भाजपा अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. नवी दिल्ली येथे आज शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत अमित शहा भाजपाच्या अध्यक्षपदी राहणार आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत अमित शहाच भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार होते. मात्र, भाजपाच्या आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकर्णीच्या बैठकींमध्ये अमित शहा आणि टीमची मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासून भाजपाच्या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला सुरुवात झाली. ‘2019 मध्ये आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होऊ. आमच्या या संकल्पाला कोणीही धक्का लावू शकणार नाही.’ असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपाची ही शेवटची कार्यकरणी बैठक असणार आहे. त्यामुळे या बैठकीत लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकीमधील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. खासकरून तेलंगाना राज्यामध्ये भाजप चांगले प्रदर्शन करण्याचा निर्धार केला. बैठकीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह राज्यांचे प्रदेशाध्यक्षही सहभागी झाले आहेत.