प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
मुंबई । आगामी लोकसभेच्या निवडणुका २०१९ ला न घेता २०१८ च्या शेवटी घेतल्या जातील. या २०१८ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना काँग्रेस पर्याय ठरू शकत नाही. मोदींना शह देण्याची डाव्यांना मोठी संधी आहे. डाव्यांनी पुढाकार घेतल्यास जी परिस्थिती काँग्रेसची झाली तीच परिस्थिती भाजपाची होऊ शकते. भाजपाला काँग्रेस पर्याय ठरू शकते हे मी मान्य करू शकत नाही, मात्र २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपाला पर्याय ठरू शकते. कर्नाटक राज्याच्या निवडणूका महत्वाच्या आहेत. कर्नाटक जिंकेल त्याचीच देशात सत्ता असेल. यामुळे दोन राज्याच्या निवडणुकीबरोबर लोकसभा निवडणूक घेतली जाईल असे संकेत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रपरिषदेत कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते.
राजकारण्यांकडे विकासाचा आराखडा नाही
यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, राजकारणात विश्वासार्हता असावी लागते. हि विश्वासार्हता २००३ नंतर निर्माण झाली. अटलबिहारी वाजपेयी त्यातील शेवटचा दुवा होते. वाजपेयी यांच्यामध्ये पक्षाच्या विरोधात सत्य मांडण्याची ताकद होती. आता सध्याच्या राजकारणात ही विश्वासार्हता दिसत नाही. राजकारण्यांकडे विकासाचा आराखडा नाही. नवीन पिढी संधी शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना आरक्षणाचे कारण देऊन नकारात्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नव्या पिढीतील तरुणांशी आम्ही सतत संवाद साधत होतो या संवादांमुळेच भिमा कोरेगांव प्रकरणानंतर दंगल घडवण्याची काही लोकांची इच्छा होती असूनही दंगल घडली नाही असे आंबेडकर म्हणाले. भीमा कोरेगांव प्रकरणानंतर आयोजित बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाल्याने त्याला नक्षलवादाचे नाव दिले जात आहे. आजच्या विद्यार्थ्यांना हिंसा मान्य नसून लोकशाही मान्य आहे. अशा विद्यार्थ्यांना पकडून पोलीस मोठी चूक करत आहेत. हिंसा मान्य नसलेल्या विद्यार्थ्यांना हिंसक बनवण्याचे काम पोलीस आणि सरकारकडून सुरु असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. बंद दरम्यान जे झाले त्यावर बोलले जाते मात्र १ जानेवारीला जे घडले त्याबाबत काहीच चर्चा केली जात नसल्याची खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली. सरकारने १ जानेवारीच्या प्रकाराला जबाबदार लोकांवर वेळीच कारवाई केली असती तर लोकांना रस्त्यावर उतरण्याची गरजच पडली नसती असे आंबेडकर यांनी सांगितले.
२२ जानेवारीला भूमिका जाहीर करणार
– भीमा कोरेगांव प्रकरणी अद्याप ३ हजार लोकांना अटक केली. त्यापैकी १०० लोक सोडल्यास सर्वाना जामिनावर सोडून देण्यात आले आहे. मात्र भीमा कोरेगांव प्रकरणी एकबोटे व भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांना सरकार अटक करेल अशी मला अपेक्षा आहे. एकबोटे व भिडे यांना अटक न झाल्यास २२ तारखेला दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदे परिषदेत पुढील भूमिका जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकरयांनी सांगितले.