लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

0

भुसावळ विधानसभा मतदारसंघात 315 मतदान केंद्र ; अपंग मतदारांसाठी 39 व्हिलचेअरसह दहा वाहनांची व्यवस्था ; 11 संवेदनशील केंद्रावर तगडा बंदोबस्त

भुसावळ- रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, 23 रोजी मतदान होत असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. भाजपाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे डॉ.उल्हास पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर या प्रमुख तीन उमेदवारांसह एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 315 मतदान केंद्र असून या केंद्रासाठी तितकेच ईव्हीएम, व्हिव्हिपॅट मशीन तसेच 35 राखीव ईव्हीएम मशीन असणार आहे शिवाय निवडणूक प्रक्रिया राबविणार्‍या कर्मचार्‍यांना ने-आण करण्यासाठी 28 बसेससह 86 खाजगी कार-जीप अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भुसावळ तालुक्यात 11 संवेदनशील मतदान केंद्र असून तेथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.

बसेससह खाजगी वाहनांचे अधिग्रहण
भुसावळ तालुक्यात एकूण 315 मतदान केंद्र असून त्यातील 11 संवेदनशील आहेत. या केंद्रावर मतदान कर्मचार्‍यांना पुरवण्यात येणार्‍या सोयी-सुविधांबाबत अधिकार्‍यांकडून नुकताच आढावादेखील घेण्यात आला. शिवाय निवडणूक कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावन जाण्या-येण्यासाठी तसेच मतदान यंत्र, व्हिव्हिपॅट मशीन नेण्यासाठी तब्बल 28 बसेस तसेच खाजगी 86 जीप-कार अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

निवडणूक साहित्याचे आज होणार वाटप
निवडणूक कर्मचार्‍यांना प्रभाकर हॉलसमोर प्रशासकीय इमारतीत सोमवारी सकाळी सात वाजेपासून निवडणूक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेंद्र पवार, नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे व विजय भालेराव लक्ष ठेवून आहेत.

तीन लाख मतदार बजावणार हक्क
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार रावेर लोकसभा निवडणुकीसाठी भुसावळ मतदारसंघातून तीन लाख 13 हजार 213 मतदार हक्क बजावतील. त्यात एक लाख 43 हजार 802 स्त्री मतदर तसेच एक लाख 69 हजार 449 पुरूष मतदार तसेच अन्य तृतीयपंथी मिळून 22 मतदार हक्क बजावणार आहेत.

पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त
भुसावळ मतदारसंघात निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. त्यात एक पोलिस उपअधीक्षक, तीन निरीक्षक, चार सहाय्यक निरीक्षक, 14 उपनिरीक्षक, 228 पोलिस, 175 होमगार्ड, एसआरपी प्लाटून, एक पॅरामेडिकल कंपनी तैनात राहणार आहे शिवाय फिरत्या पथकांकडून मतदान केंद्रावर गस्त घातली जाणार आहे. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे.

सुट्या रद्द, कर्मचारी गुंतले निवडणुकीत
लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत शिवाय तातडीची रजादेखील नाकारली जात आहे. सर्वच विभागांच्या कर्मचार्‍यांना निवडणूक कामात गुंतवण्यात आल्याने अन्य विभागात मात्र शुकशुकाट जाणवत आहे. तहसील कार्यालयात देखील विविध कामे घेवून येणार्‍या नागरीकांना निवडणुकीत व्यस्त असणार्‍या कर्मचार्‍यांमुळे माघारी परतावे लागत आहे.

नगरपालिकेतही शुकशुकाट
नगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने नागरीकांची कामे खोळंबली आहेत. 5 मार्चपासून पालिका कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द असून सर्व कर्मचारी तहसीलमध्ये निवडणूक कामात व्यस्त आहेत.

रणरणत्या उन्हात कर्मचारी झाले घामाघूम
हॉट सिटी असलेल्या भुसावळ शहराचा पारा 44 अंशावर केव्हाच गेला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर निवडणुकीसाठी आरक्षित केलेल्या वाहनांमध्ये कर्मचारी फिरत असलेतरी प्रशासनाकडून विना एसी वाहनांच्या बोलीवर करार करण्यात आल्याने कर्मचारी घामाघूम होवून काम करीत आहेत.